Udyogini Scheme : उद्योगिनी योजना ही सरकारची कर्ज देणारी योजना आहे, ज्याचा मुख्य उद्देश महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणे हा आहे. ही काही नवीन योजना नाही; तर 1997-1998 मध्ये भारत सरकारने ती सुरू केली होती आणि नंतर 2004-05 मध्ये यात बदल करण्यात आले. गेल्या काही वर्षांत नोकरीपासून व्यवसायापर्यंतच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वेगाने वाढत आहे. भारतात सुमारे 20 टक्के व्यवसायांच्या मालक महिला आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे तारणाशिवाय कर्ज दिले जाते.
योजनेची वैशिष्ट्ये आणि संधी
उद्योगिनी योजना अशा महिलांसाठी आहे, ज्या स्वतःचा व्यवसाय (Women Owned Business) सुरू करू इच्छितात. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे महिलांना तारणाशिवाय (Without Guarantee Loan) कर्ज मिळते. सुरुवातीला ही योजना कर्नाटक राज्य सरकारने आपल्या राज्यातील महिलांना लाभ देण्याच्या उद्देशाने सुरू केली होती, जी नंतर केंद्र सरकारनेही सुरू केली. या कर्जाचा वापर करून महिला सौंदर्य प्रसाधन केंद्र शिवणकाम किंवा इतर कोणताही व्यवसाय सुरू करू शकतात. अलिकडेच एका अहवालानुसार, भारतात कर्ज घेणाऱ्या महिलांची संख्या गेल्या पाच वर्षांत 22 टक्के या वार्षिक दराने वाढली आहे, ज्यामध्ये बहुतांश महिला ग्रामीण आणि निम-शहरी भागातील आहेत.
लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मात्र, विधवा आणि दिव्यांग महिलांसाठी उत्पन्नाची अशी कोणतीही मर्यादा नाही; त्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 18 ते 55 वर्षांपर्यंतच्या महिला या योजनेतून कर्ज घेऊ शकतात. या कर्जासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क (Loan Processing Fee) भरावे लागत नाही.
हेही वाचा – Marriage Scheme : लग्न करण्यासाठी जोडप्यांना 2.5 लाखांची आर्थिक मदत! जाणून घ्या, नेमकी काय आहे योजना?
कर्जावर मिळते अनुदान
साधारणपणे जितके कर्ज घेतले जाते, त्यापेक्षा जास्त रक्कम परत करावी लागते. परंतु, या उद्योगिनी योजनेत (Udyogini Yojana Subsidy) तसे होत नाही. यामध्ये सरकारकडून तुम्हाला अनुदान देखील दिले जाते. सरकार या कर्जावर 30 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. 1 लाख ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेतून मिळू शकते. कर्जासाठी आधार कार्ड, दारिद्र्यरेषेखालील कार्ड (BPL Card), जात प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे सादर करावी लागतात.
अर्ज करण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हीही महिला असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिता, तर ही योजना तुमच्यासाठी मोठा आधार ठरू शकते; कारण यात तुम्हाला अनुदानाचा लाभदेखील मिळू शकतो. अर्ज करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन किंवा मायस्कीम डॉट जीओव्ही डॉट आयएन (myscheme.gov.in) या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज (Online Application for Udyogini Yojana) भरू शकता.
यासाठी लागणारी कागदपत्रे (Documents for Udyogini Yojana) खालीलप्रमाणे आहेत:
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र
प्रकल्प अहवाल
जात प्रमाणपत्र
प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र