Uddhav Thackeray On BJP: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेल्या पैशाच्या उधळपट्टी आणि भ्रष्टाचारावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, “सर्वत्र मतांचा लिलाव सुरू आहे. निवडणुकीत पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत, पण हा पैसा कुठून येतो, याचं उत्तर कोणी देत नाही. निवडणुकीत पैशाची अतिवृष्टी सुरु आहे. प्रचारात सत्तेचा माज दिसतोय.” त्यांच्या मते, ही सत्ताधारींची दर्पयुक्त वागणूक आणि सत्तेचा माज महाराष्ट्राच्या जनतेवर थेट परिणाम करीत आहे.
उद्धव ठाकरेंनी पुढे म्हटलं आहे की, आजच्या काळात एकही मंत्री शेतकऱ्यांशी किंवा शहरातील नागरिकांशी संवाद साधत नाही. “ना शेतकऱ्यांचं ऐकणारे, ना नागरिकांचा आवाज ऐकणारे हे आजचे सत्ताधारी आहेत.” दरम्यान यावेळी त्यांनी मुंबईतील प्रदूषणावर देखील लक्ष वेधले. ठाकरे म्हणाले, “मुंबईत गेल्या दोन-तीन वर्षांत हवेत प्रदूषण असह्य पातळीवर पोहोचले आहे. हा फक्त धूळ-धूराचा प्रश्न नाही, तर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे. भ्रष्टाचाराचे ढग संपूर्ण महाराष्ट्रावर घोंगावत आहेत.”
आणि तपोवन प्रकल्पाबाबतही गंभीर आरोप
उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड आणि तपोवन प्रकल्पाबाबतही गंभीर आरोप केले. “मी मुख्यमंत्री असताना आरे कारशेडला तत्काळ स्थगिती दिली होती. पण आता झाडांची कत्तल करून विकासाच्या नावाखाली कंत्राटदारांचा विकास सुरू आहे. संजय गांधी नॅशनल पार्कची कत्तल करण्याचे डावपेच सुरू आहेत आणि तपोवन प्रकल्पामध्येही हजारो झाडं कापली जात आहेत,” असा आरोपही त्यांनी यावेळी नमूद केलं.
हेही वाचा – Ambadas Danve PC : “संजय शिरसाट यांचा घोटाळ्यात मोठा हात, चौकशी करा” दानवे सरकारवर संतापले
भाजपच्या हिंदुत्व धोरणावर टीका
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या हिंदुत्व धोरणावर टीका करताना म्हटलं की, “भाजपचं हिंदुत्व हे फक्त तोंडात राम आणि बगलमध्ये अदानी, असा थोतांड आहे. सरकार तपोवन नष्ट करून पुण्य पदरात पाडण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरु असून भाजपचं हे हिंदुत्व थोतांड आहे,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ठाकरे यांच्या मते, या प्रकारचा भ्रष्टाचार आणि नैसर्गिक व पवित्र स्थळांचे नाश हे फक्त पर्यावरणीय नाही, तर सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या देखील चिंताजनक आहे.