वाशिम: शिवसेनेतील (UBT) मोठ्या राजकीय भूकंपानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. 6 खासदारांच्या फुटीनंतर डगमगून न जाता ठाकरेंनी जनसंवाद दौरे सुरू केले आहेत. खासदार संजय दिना पाटील यांच्या ईशान्य मुंबई मतदारसंघात पहिली सभा घेतल्यानंतर, आता ठाकरेंनी आपला मोर्चा वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. येथे जाहीर सभा घेत उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या नावाची पहिली उमेदवारी जाहीर करून राजकीय रणशिंग फुंकले.
दरम्यान, आपल्या दौऱ्याची खिल्ली उडवणाऱ्या विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घराबाहेर पडताच काहींनी 'शिवसेना संपली' म्हणून कोल्हेकुई सुरू केली. पण कडवट शिवसैनिक अजूनही जागेवरच आहे, हे मी त्यांना दाखवून देईन. आपण ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले, त्यांनीच नमकहरामी केली. अशा गद्दारांना आता जनतेने थारा देऊ नये." उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांचा 'लुटारू' असा उल्लेख करत त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. "बाबरी मशीद पाडली तेव्हा हे सगळे शेपूट घालून पळाले होते. शौर्य आणि भाजप हे दोन परस्परविरोधी शब्द आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते, तर आज भाजपला कोणी विचारलेही नसते," असा घणाघात त्यांनी केला.
'मशाल' घेऊन लढलो; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर तोफ
मतदारांची माफी मागत ठाकरे म्हणाले, 'ऐन शेवटच्या 15 दिवसांत 'मशाल' चिन्ह मिळूनही तुम्ही पक्षाचे 9 खासदार निवडून दिले. पण या बंडखोरांनी आधीच गद्दारीची स्क्रिप्ट तयार केली होती. मी जेव्हा खासदारांची बैठक घेत होतो, तेव्हा दुसरीकडे यांची खोक्यांची बोलणी सुरू होती.' भाजपच्या हिंदुत्वाचा 'भोंदुत्व' असा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, 'आमचे हिंदुत्व हाताला काम आणि शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दाम देणारे आहे. आम्ही हा गद्दारीचा आणि राम मंदिराचा मुद्दा कधीही सोडणार नाही.'
शेतकरी आत्महत्यांवरून सरकारला घेरलं
दरम्यान, वाशिम-यवतमाळ भागात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांवर चिंता व्यक्त करत ठाकरेंनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर आक्षेप घेतला. 'माफी ही गुन्हेगाराला दिली जाते, शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, तर पूर्ण कर्जमुक्ती करावी लागेल,' अशी मागणी त्यांनी केली. तसेच, गद्दार खासदार जिथे दिसतील तिथे त्यांना त्यांच्याच भाषेत जाब विचारण्याचे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
डॉ. सिद्धार्थ देवळेंना उमेदवारीचे संकेत
तथापि, गेल्या निवडणुकीत वाशिम (SC) मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढताना डॉ. सिद्धार्थ देवळे यांचा भाजपच्या श्याम खोडे यांच्याकडून निसटता पराभव झाला होता. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत ठाकरे म्हणाले, सिद्धार्थ देवळे, तुम्ही आतापासूनच कामाला लागा. तुमच्या हातात अजून 3 वर्षे आहेत. या विधानाद्वारे त्यांनी देवळेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर आणि टीकेवर सत्ताधारी पक्षाचे मंत्री संजय राठोड यांनी पलटवार केला आहे. 'जो गरजते है वो बरसते नही,' असा टोला लगावत राठोड म्हणाले की, आम्ही कोणाच्याही टीकेला उत्तर न देता कामातून उत्तर देऊ. आम्ही 40 आमदारांनी केलेल्या उठावाचे आता 60 आमदार झाले असून ही संख्या सतत वाढत आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवून आगामी काळात अनेक मोठे प्रवेश आमच्या शिवसेनेत पाहायला मिळतील, असा दावाही त्यांनी केला.