Uddhav Thackeray: अयोध्येतील कथित चोरीवरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; म्हणाले, ‘अयोध्या तर झांकी, मग काशी-मथुरा…’

आंदोलनादरम्यान महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करून धार्मिक वातावरणात निषेध नोंदविण्यात आला.

Uddhav Thackeray: अयोध्येतील कथित चोरीवरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; म्हणाले, ‘अयोध्या तर झांकी, मग काशी-मथुरा…’

Uddhav Thackeray: अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्यभर 'रामरक्षा आंदोलन' छेडले आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरातून करण्यात आली. आंदोलनादरम्यान महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे सामूहिक पठण करून धार्मिक वातावरणात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.

'धार्मिक भावनांचा गैरवापर सहन करणार नाही'

आपण हिंदुत्वाचा केवळ राजकीय नव्हे, तर श्रद्धेचा मुद्दा मानतो, असे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदू समाज श्रद्धाळू असला तरी तो अंधळा नाही. धार्मिक भावनांचा आधार घेत मंदिरांमध्ये गैरव्यवहार होत असतील, तर त्याविरोधात आवाज उठविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. देवाच्या नावावर कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

राम मंदिर आंदोलनातील शिवसैनिकांच्या भूमिकेची आठवण

अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या योगदानावर भर दिला. 'मंदिर वही बनायेंगे' आणि 'जय श्रीराम'च्या घोषणांच्या काळात कारसेवा, रथयात्रा आणि शिलापूजन अशा विविध आंदोलनांमध्ये शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

'अयोध्या तो झांकी…' घोषणेवरून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह

पूर्वी दिल्या जाणाऱ्या 'अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है' या घोषणेचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अयोध्येतील कथित गैरव्यवहारच जर केवळ सुरुवात असेल, तर पुढील काळात इतर धार्मिक स्थळांचे काय होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस शिवसैनिकांकडेच असल्याचा दावा त्यांनी केला.

विविध मंदिरांतील कथित प्रकरणांचा उल्लेख

देशात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असतानाही अनेक प्रमुख मंदिरांमध्ये कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या घटना समोर आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. केदारनाथ मंदिरातील कथित सुवर्ण घोटाळा, उज्जैनच्या महाकाल मंदिराशी संबंधित जमिनींचे वाद, बद्रीनाथ परिसरातील कथित चोरीच्या घटना आणि अयोध्येत सोन्याचा मुलामा असलेले रामचरितमानस गायब झाल्याच्या आरोपांचा त्यांनी उल्लेख केला. या सर्व प्रकरणांमध्ये अद्याप समाधानकारक स्पष्टीकरण मिळाले नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – Dattatray Bharne: शेतकरी कर्जमाफीला विलंब का? कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं नेमकं कारण; म्हणाले, 'लवकरच खात्यात…'

राम मंदिरासाठी दिलेल्या योगदानाचा केला उल्लेख

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेने दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. मंदिरासाठी अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या विटांचे पुढे काय झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अयोध्येतील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत महायुती सरकार आणि भाजपने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी करत त्यांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number