Ambadas Danve: विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. “सगळ्यांचा आग्रह उद्धव ठाकरेंनीच निवडणूक लढवावी असा असताना, त्यांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले, ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. उद्धव ठाकरेंनी मला त्यांची जागा दिली,” अशी भावना दानवे यांनी व्यक्त केली.
‘मी एकटाच पात्र नाही, पण मी नशीबवान’
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना दानवे यांनी अत्यंत नम्रपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “पक्ष म्हणजे काही देवाणघेवाणीचा व्यवहार नसतो. मी काहीतरी केले म्हणून मला ही संधी मिळाली, असे मी मानत नाही. पक्ष एका विचाराने चालतो. पक्षात अनेक सक्षम लोक इच्छुक होते, त्या सर्वांमध्ये मला ही संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.” अंबादास दानवे यांनी पुढे म्हटलं आहे की, ही उमेदवारी केवळ शिवसेनेची नसून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांशी सविस्तर चर्चा करूनच उद्धव ठाकरेंनी घेतला निर्णय आहे. दरम्यान, अनिल देसाई आणि अनिल परब हे इतर पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधत असून, अर्ज भरताना महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा – Shiv Sena UBT Candidate: मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंची माघार
रस्त्यावरील संघर्ष सुरूच राहणार
“संघटनेचे काम करताना वाटेत दगड-काचा येणारच, पण त्यावर मात करून पुढे जाणे हे शिवसैनिकाचे काम आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. तथापी, संजय राऊत यांनी जाहीर केल्याप्रमाणे, उद्या सकाळी 11 वाजता दानवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उद्धव ठाकरेंनी स्वतः माघार घेऊन दानवेंना दिलेली ही संधी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरण्यासाठीचा एक मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.