Shiv Sena UBT Rebellation : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठे बंड होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकीय वर्तुळात याने खळबळ उडवून दिली आहे. काल दिल्लीमध्ये घडलेल्या अत्यंत वेगवान घडामोडींनंतर ठाकरे गटाचे तब्बल 7 खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खासदार थेट आपला एक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून, याला 'ऑपरेशन टायगर' असे नाव दिले गेल्याचे बोलले जात आहे. जर ही शक्यता खरी ठरली, तर लोकसभा निवडणुकीनंतर स्थिरावू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असू शकतो. या संभाव्य बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या पक्षातील सर्व खासदारांची एक बैठक 'मातोश्री'वर बोलावली होती, ज्यामध्ये काही खासदार प्रत्यक्ष हजर नव्हते; तर, ते ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले होते.
'त्या' अफवांवर विश्वास ठेऊ नका; 'मातोश्री'वरून पदाधिकाऱ्यांना थेट आवाहन
खासदार फुटीच्या या चक्रावून टाकणाऱ्या बातम्यांदरम्यान, ठाकरे सेनेकडून तातडीने डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून काल दुपारी 12.30 वाजता 'मातोश्री'वर ईशान्य मुंबईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, विभागप्रमुखांची आणि संघटकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी, 'पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत, परंतु या निव्वळ अफवा असून कोणीही यावर विश्वास ठेवू नका,' असे स्पष्ट शब्दांत सांगितले. आपले सर्व खासदार पक्षासोबतच घट्ट उभे असल्याचा मोठा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
खासदार संजय दिना पाटील खंबीर; कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याच्या सूचना
विशेष म्हणजे, या अंतर्गत बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचे नाव घेत, ते पूर्णपणे आपल्यासोबतच खंबीरपणे उभे असल्याचे पदाधिकाऱ्यांना आवर्जून सांगितले. प्रसारमाध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीने तर्कवितर्क लढवले जात आहेत, त्याला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व खासदारांनाही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, खासदारांनी आपापल्या भागातील स्थानिक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तातडीने विश्वासात घेऊन, या संपूर्ण प्रकरणावर आपले अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, जेणेकरून तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.
दिल्लीतील घडामोडींमुळे पुन्हा 'शिवसेना' फुटणार? राजकीय सस्पेन्स वाढला
'मातोश्री'वर दुपारच्या सत्रात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडल्यानंतर, पुन्हा सायंकाळी दिल्लीमध्ये काही मोठ्या आणि संशयास्पद घडामोडी घडताना दिसल्या. त्यामुळे 'पुन्हा एकदा शिवसेना फुटणार का?' हा प्रश्न आता अधिक गडद झाला आहे. सध्या ठाकरे गटाकडून एका बाजूला कार्यकर्त्यांना धीर देण्याचे आणि पक्षातील अंतर्गत एकजूट टिकवून ठेवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला दिल्लीत सुरू असलेल्या गुप्त हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स कमालीचा वाढला असून, आगामी काळात हे 'ऑपरेशन टायगर' नक्की कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.