Nashik Municipal Election: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या दोन माजी महापौरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. अशोक मुर्तडक आणि दशरथ पाटील या दोन दिग्गज नेत्यांनी हाती धनुष्यबाण घेतल्याने नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांचे स्वागत करत त्यांना सन्मानाने पक्षात सामावून घेतले. ऐन प्रचाराच्या धामधुमीत झालेल्या या पक्षबदलामुळे भाजपला नाशिकमध्ये मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अशोक मुर्तडक यांची तिकीट नाकारल्याने भाजपला सोडचिठ्ठी
मनसेच्या सत्ताकाळात महापौर राहिलेले अशोक मुर्तडक यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आगामी निवडणुकीसाठी त्यांनी प्रभाग क्रमांक 6 मधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष अर्ज दाखल केला. अखेर सन्मान मिळत नसल्याचे पाहून त्यांनी शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला.
मुलापाठोपाठ वडिलांचाही शिवसेनेत प्रवेश
माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील हे आधीपासूनच शिवसेनेत सक्रिय असून त्यांना पक्षाने प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी दिली आहे. दशरथ पाटील यांनीही यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र मुलाला मिळालेली उमेदवारी आणि जुन्या सहकाऱ्यांचे प्रेम यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. पाटील यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला संपूर्ण नाशिक शहरात होण्याची शक्यता आहे.
? ठाणे |#नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे तसेच नाशिक येथील स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.#Shivsena #Nashik #EknathShinde… pic.twitter.com/ByGlP7v93o — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2026
निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेत स्वतःचा भगवा फडकवण्यासाठी शिंदे यांनी स्वतः मैदानात उतरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बड्या नेत्यांचे इनकमिंग सुरू झाल्याने महायुतीमधील जागावाटप आणि बंडखोरीच्या काळात शिवसेनेने आपली पकड घट्ट केल्याचे चित्र दिसत आहे.