Massajog Sarpanch Election: दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या मस्साजोग सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत आता एक नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे. ही निवडणूक बिनविरोध करून देशमुख कुटुंबाला सहानुभूती देण्याचे प्रयत्न ग्रामस्तरावर सुरू असतानाच, मागील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
अश्विनी देशमुख यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज
आपले पती संतोष देशमुख यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी आज सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गावकरी आणि देशमुख कुटुंबाने एकमताने अश्विनी यांच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. केजच्या तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा असल्याने, कोणतेही शक्तिप्रदर्शन न करता अश्विनी देशमुख अत्यंत साध्या पद्धतीने आपला अर्ज भरला. “संतोष अण्णांचे दीड वर्षांचे राहिलेले काम पूर्ण करणे हेच माझे उद्दिष्ट आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
स्वरूपानंद देशमुख यांची एन्ट्री अन् नवा दावा
एकीकडे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा असताना, स्वरूपानंद देशमुख यांनीही आज दुपारी 1 ते 3 या वेळेत अर्ज भरण्याचे जाहीर करून सर्वांना चकित केले आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत आपण सोबत असल्याचा दावा त्यांनी केला असला, तरी त्यांच्या उमेदवारीमुळे आता प्रत्यक्ष मतदानाची शक्यता बळावली आहे.
भावाचा फोटो समोर ठेवून लढतोय – धनंजय देशमुख
या राजकीय घडामोडींवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्याचा माणूस जातो, त्यालाच ते दुःख कळते. आम्ही आमच्या भावाच्या फोटोला साक्षी मानून हे कार्य पुढे नेत आहोत. दीड वर्षांपासून आम्ही न्यायासाठी संघर्ष करत आहोत. जर कोणी या परिस्थितीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असेल, तर त्याला जनताच चोख उत्तर देईल.” धनंजय देशमुख यांनी स्वरूपानंद यांच्या उमेदवारीवर अधिक भाष्य करणे टाळले असले, तरी त्यांच्या शब्दात तीव्र नाराजी दिसून आली.
ग्रामस्थांचे लक्ष आता अर्जांच्या छाननीकडे
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. अश्विनी देशमुख यांच्या बाजूने असलेली सहानुभूती आणि स्वरूपानंद देशमुख यांनी दिलेले आव्हान यामुळे ही निवडणूक आता केवळ सत्तेची नसून प्रतिष्ठेची बनली आहे. आता किती अर्ज दाखल होतात आणि छाननीनंतर कोणाचे अर्ज शिल्लक राहतात, यावर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.