TVK Leader Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) चे प्रमुख आणि लोकप्रिय अभिनेते विजय यांनी 121 आमदारांच्या भक्कम पाठिंब्यासह तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची ‘लोक भवन’ येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान विजय यांनी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची पत्रे राज्यपालांना सुपूर्द केली असून राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा अधिकृत दावा केला आहे. विजय उद्या दुपारी 3:15 वाजता चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गेल्या चार दिवसांच्या कालावधीत थलपती विजय यांनी राज्यपालांची भेट घेण्याची ही चौथी वेळ आहे.
बहुमताचा ‘जादुई आकडा’ पार; मित्रपक्षांची भक्कम साथ
तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. TVK कडे आता 121 आमदारांचे संख्याबळ असल्याने बहुमताचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. विजय यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीला खालील प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे:
काँग्रेस
CPI आणि CPI(M)
VCK (विदुथलाई चिरुथाईगल कात्ची)
IUML (इंडियन युनियन मुस्लिम लीग)
विशेष म्हणजे, VCK आणि IUML हे पक्ष दीर्घकाळापासून DMK चे मित्रपक्ष राहिले आहेत, मात्र त्यांनी शनिवारी अधिकृतपणे विजय यांच्या TVK ला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
Tamil Nadu CM-designate TVK Chief C Joseph Vijay will take oath tomorrow at 3.15 PM: Sources pic.twitter.com/FoneIhY4CD — ANI (@ANI) May 9, 2026
राज्यपालांचा केरळ दौरा रद्द; लोक भवनात हालचालींना वेग
या राजकीय नाट्यादरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आज सायंकाळी 7:10 वाजता केरळला रवाना होणार होते. मात्र, राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला आहे. यापूर्वी TVK आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांनी भेटीसाठी वेळ मागितली असता, राज्यपालांचे वेळापत्रक व्यस्त असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दौरा रद्द झाल्यामुळे आता सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला आहे.
#WATCH | TVK Chief Vijay meets Tamil Nadu Governor Rajendra Vishwanath Arlekar at the Lok Bhavan. With the support of Congress, CPI, CPI(M), VCK and IUML, 121 MLAs are now in support of TVK, and its path to form a government in the state is now clear. (Source: Lok Bhavan) pic.twitter.com/Tbck1TrAKJ — ANI (@ANI) May 9, 2026
लोक भवनात सत्तास्थापनेचा दावा सादर
विजय यांनी लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन पाठिंब्याची सर्व कागदपत्रे सादर केली. जर राज्यपालांनी हा दौरा रद्द केला नसता, तर सत्तास्थापनेची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता होती. या घडामोडींमुळे तामिळनाडूमध्ये आता एका नवीन राजकीय युगाची सुरुवात होताना दिसत आहे.