Trump Iran Peace Plan: मध्यपूर्वेतील वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसमोर एक महत्त्वपूर्ण 15-कलमी युद्धविराम प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे, या वाटाघाटींसाठी ट्रम्प यांनी पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून निवड केली असून, या योजनेची रूपरेषा पाकिस्तानी दूतावासांमार्फत तेहरानपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. एकीकडे शांततेचा प्रस्ताव मांडला असतानाच, दुसरीकडे अमेरिकेने मध्यपूर्वेत अतिरिक्त 1000 सैनिक आणि 'मरीन' तुकड्या तैनात करून आपली लष्करी लवचिकता (Maximum Flexibility) वाढवण्यावर भर दिला आहे.
काय आहे ट्रम्प यांची 15-कलमी योजना?
'ट्रम्प यांच्या प्रस्तावात इराणवर अत्यंत कडक अटी लादण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे:
अणू कार्यक्रमावर बंदी: इराणने आपला सध्याचा अणू कार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढावा आणि भविष्यात अण्वस्त्रे न बनवण्याची लेखी हमी द्यावी.
युरेनियम साठा सुपूर्द करणे: इराणकडे असलेला 60 टक्के संवर्धित युरेनियमचा साठा IAEA कडे सोपवावा लागेल.
प्रकल्प नष्ट करणे: नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो येथील अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट करून देशभरात कुठेही आंतरराष्ट्रीय तपासणीची मुभा द्यावी.
क्षेपणास्त्र आणि प्रॉक्सी युद्धावर निर्बंध: इराणने आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता मर्यादित करावी आणि हमास, हिजबुल्ला सारख्या सशस्त्र गटांना (Proxies) पाठिंबा देणे थांबवावे. तसेच, होर्मुझची सामुद्रधुनी जागतिक वाहतुकीसाठी सदैव खुली ठेवावी.
इराणच्या प्रति-अटी आणि इस्रायलचा विरोध
ट्रम्प यांच्या या योजनेमुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे, कारण इस्रायल इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी आग्रही होता. मात्र, इराणने या प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट करताना अत्यंत कडक अटी ठेवल्या आहेत. इराणच्या मागण्यांनुसार:
1. अमेरिका आणि इस्रायलने संपूर्ण युद्धबंदी लागू करावी.
2. शांततापूर्ण अणू कार्यक्रमाचा आणि युरेनियम संवर्धनाचा अधिकार मान्य करावा.
3. युद्धातील नुकसानीसाठी नुकसानभरपाई (Reparations) मिळावी.
4. आखाती प्रदेशातील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ बंद करण्यात यावेत.
5. प्रादेशिक प्रतिनिधी गट (Proxies) आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
वाटाघाटींमधील प्रमुख अडथळे आणि 'खार्ग बेटा'चे सावट
इराणने सध्यातरी अमेरिकेशी थेट चर्चा करण्यास नकार दिला आहे. इराणच्या मनात अमेरिकेबद्दल तीव्र संशय आहे, कारण यापूर्वी उच्चस्तरीय चर्चा सुरू असतानाही अमेरिकेने हल्ले केले होते. दरम्यान, पर्शियन आखातातील इराणचे तेल उत्पादनासाठी महत्त्वाचे असलेले 'खार्ग बेट' अमेरिका ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेने या बेटावर नुकताच बॉम्बहल्ला केल्यामुळे इराणच्या तेल पायाभूत सुविधांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या अटी इराणला सहजासहजी मान्य होण्यासारख्या नसल्याने, हा युद्धविराम प्रस्ताव प्रत्यक्षात येणार की संघर्षाची ठिणगी आणखी पेटणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.