Trump Truth Social Post on Iran : जागतिक राजकारणात सध्या कमालीची खळबळ उडाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मध्य पूर्वेचा एक वादग्रस्त नकाशा शेअर केल्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या घडामोडीकडे वेधले गेले आहे. मध्य पूर्वेतील सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात नेमकी कोणी माघार घ्यायची, यावरून प्रचंड वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला युद्धाचे संकेत देणारी चित्रे पोस्ट करत आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
एआय जनरेटेड इमेजेसमधून भडकाऊ इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांच्या कालावधीत 20 पेक्षा जास्त एआय-जनरेटेड (कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार केलेली) चित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या बहुतांश फोटोंच्या माध्यमातून इराणवर अमेरिकन लष्कराकडून मोठी कारवाई केली जाईल, अशी उघड धमकी देण्यात आली आहे. शेअर केलेल्या एका नकाशात इराणचा भूभाग दाखवण्यात आला असून त्यावर अमेरिकेचा झेंडा लावण्यात आला आहे आणि चहूबाजूंनी इराणच्या दिशेने बाण सोडलेले दिसत आहेत. याशिवाय, अमेरिकन ड्रोन इराणी ‘फास्ट बोट्स’वर क्षेपणास्त्र हल्ला करत असल्याचे एका चित्रात दाखवले असून त्याला ट्रम्प यांनी “बाय बाय, फास्ट बोट्स” (BYE BYE, Fast boats) असे कॅप्शन दिले आहे.
5 सेकंदांचा तो वादग्रस्त व्हिडिओ
सोशल मीडियावरील या युद्धाच्या धमक्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडिओ देखील जोडला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेची एक अवाढव्य युद्धनौका इराणी विमानाला थेट लक्ष्य करताना दिसत आहे. या दृश्यासोबत ट्रम्प यांनी स्वतःची एक क्लिप जोडली आहे. अवघ्या 5 सेकंदांच्या या क्लिपमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प टेबलावर हात आपटताना, संगणकावर काहीतरी टाईप करण्याचे कृती करताना आणि तोंडाने “बा बा बा बा… फायर, बूम” असा आवाज काढताना दिसत आहेत. या विचित्र पण आक्रमक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
अवकाश युद्ध आणि अणुस्फोटाची भीती
फक्त पृथ्वीवरच नव्हे, तर ट्रम्प यांनी थेट अंतराळातून इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. स्वतःला अंतराळात उपग्रहांनी वेढलेले दाखवणारे एक चित्र त्यांनी पोस्ट केले असून त्याला “स्पेस फोर्स” (Space Force) असे शीर्षक दिले आहे. यामध्ये ते अंतराळातून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांवर देखरेख ठेवताना दिसत आहेत. दुसऱ्या एका चित्रात ट्रम्प एका अत्याधुनिक अंतराळ जहाजावरील ‘किल’ (Kill) नावाचे लाल बटण दाबतांना दिसत आहेत, तर त्यांच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अनेक संगणक स्क्रीनवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले आणि अणुस्फोटासारखी भयानक दृश्ये चमकत आहेत.
शांतता करारासाठी अंतिम मुदत
28 फेब्रुवारीपासून अमेरिकन आणि इस्रायली दलांनी इराणवर मोठे लष्करी हल्ले सुरू केल्यामुळे वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. हा वाद मिटवण्यात आणि मध्यपूर्वेला हादरवून सोडणाऱ्या या युद्धाला पूर्णविराम देण्यात अद्याप यश आलेले नाही. याच दरम्यान ट्रम्प यांनी इराणला शांतता करारासाठी तातडीने पावले उचलण्याचा नवा इशारा दिला आहे. त्यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले की, “इराणसाठी आता वेळ संपत चालली आहे. त्यांनी लवकरात लवकर हालचाल केलेली बरी, अन्यथा त्यांचे काहीही शिल्लक राहणार नाही. सध्या वेळ अत्यंत महत्त्वाची आहे!” या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर गगनाला भिडले असून जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होत आहेत.
हेही वाचा – Iran on Internet Toll Tax: आधीच जग उर्जा संकटात त्यात इराण ओतणार तेल, संपूर्ण जगाची इंटरनेट सेवा होणार ठप्प?