Boat Capsize: अंदमानच्या अथांग समुद्रातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या निर्वासितांना घेऊन मलेशियाच्या दिशेने निघालेली एक प्रवासी नौका उलटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात सुमारे 250 प्रवासी बेपत्ता असून, या सर्वांना जलसमाधी मिळाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त गर्दी अन् निसर्गाचा कोप
'संयुक्त राष्ट्रांची निर्वासित संस्था' (UNHCR) आणि 'आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटने'ने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या नौकेमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रवासी भरलेले होते. ओव्हरलोडिंग आणि समुद्रातील खवळलेले हवामान या दोन मुख्य कारणांमुळे नौकेचा समतोल बिघडला आणि ती भरसमुद्रात उलटली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मलेशियाचे स्वप्न अधुरेच
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी चांगले भविष्य शोधण्यासाठी बेकायदेशीर मार्गाने मलेशियाला जात होते. या नौकेत प्रामुख्याने बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्या समुदायातील लोकांचा समावेश होता. प्रवासादरम्यान अचानक हा अपघात झाला, ज्यामुळे कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.
बचावकार्यात मोठे आव्हान
ही दुर्घटना नेमकी कोणत्या वेळी आणि कोणत्या ठिकाणी घडली, याची अधिकृत माहिती अद्याप प्रशासनाकडून मिळणे बाकी आहे. समुद्रात सध्या व्यापक शोध मोहीम राबवली जात असली, तरी बेपत्ता लोकांची संख्या मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अंदमान प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असले तरी प्रतिकूल हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.