TMC Political Crisis : ममता बॅनर्जींना मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट, 100 हून अधिक नगरसेवकांचे राजीनामे!

पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या हक्काच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातच पक्षाला सर्वात मोठे खिंडार पडले आहे. यासह एकूण 100 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत.

TMC Political Crisis : ममता बॅनर्जींना मोठा धक्का; तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट, 100 हून अधिक नगरसेवकांचे राजीनामे!

TMC Political Crisis : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची (TMC) अंतर्गत व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. निवडणूक निकाल जाहीर होऊन अवघे 3 आठवडे उलटले असतानाच पक्षाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. उत्तर आणि दक्षिण 24 परगण्यासह तब्बल 7 नगरपालिकांमधील 100 हून अधिक नगरसेवकांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ममता बॅनर्जी यांच्यासमोर अस्तित्वाचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

अभिषेक बॅनर्जींच्या ‘डायमंड हार्बर मॉडेल’ची हवा गुल; 8 नगरसेवक बाहेर
पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या हक्काच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातच पक्षाला सर्वात मोठे खिंडार पडले आहे. येथील 16 पैकी 8 नगरसेवकांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये दिब्येंदु हलदार (प्रभाग 1), मंजू मोंडल (प्रभाग 2), तमाल हलदार (प्रभाग 7), मृदुल हलदार (प्रभाग 8), स्वप्न हलदार (प्रभाग 9), आलोक हलदार (प्रभाग 11), अमित साहा (प्रभाग 13) आणि देवकी हलदार (प्रभाग 16) यांचा समावेश आहे. या नगरसेवकांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या बहुचर्चित 'डायमंड हार्बर मॉडेल'वर कडक शब्दांत टीका केली असून, येथे प्रशासनाऐवजी पोलिसांची हुकूमशाही चालत असल्याचा आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्यास छळ होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

उत्तर 24 परगणा जिल्ह्यात सामूहिक बंडखोरी
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील 5 प्रमुख नगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला असून तेथील परिस्थिती खालीलप्रमाणे आहे:
भाटपारा: येथील एकूण 35 नगरसेवकांपैकी तब्बल 30 जणांनी राजीनामा दिला आहे.
गारुलिया: येथील 21 पैकी 18 नगरसेवकांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे.
हालिसहर: येथील 23 पैकी 16 नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
कांचरापारा: येथील 24 पैकी 14 नगरसेवकांचे राजीनामे आले आहेत.
उत्तर बराकपूर: एकूण 23 प्रभागांपैकी 3 नगरसेवकांचे निधन झाले आहे, तर उर्वरित 20 पैकी अध्यक्षांसह 15 जणांनी राजीनामा सादर केला आहे.
याशिवाय पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील काँथी नगरपालिकेतूनही 17 पैकी 12 नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. हा परिसर सध्याचे भाजपचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो.

हेही वाचा – Asaram Bapu Punishment Upheld : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी 'आसाराम'ची जन्मठेप कायम; हायकोर्टाचे त्वरित आत्मसमर्पणाचे आदेश

कायदा काय सांगतो? नगरपालिकांवर प्रशासक राज येण्याची शक्यता
'पश्चिम बंगाल नगरपालिका कायदा, 1993' मधील तरतुदींनुसार, जर एखाद्या नगरपालिकेत दोन-तृतीयांशपेक्षा जास्त नगरसेवकांनी राजीनामे दिले, तर राज्य सरकारला ते संनियंत्रक मंडळ बरखास्त करण्याचा अधिकार मिळतो. त्यानुसार 'कांचरापारा' आणि 'डायमंड हार्बर' वगळता इतर सर्व नगरपालिकांमध्ये दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा पार झाल्याने तिथे निवडणुका होईपर्यंत प्रशासकांची नियुक्ती केली जाऊ शकते. पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या गंभीर संकटकाळात पक्ष नेतृत्वाने स्थानिक नेत्यांशी चर्चा करणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. ममता बॅनर्जी यांनी काही नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना न जाण्याची विनंती केली असली, तरी ज्यांना जायचे आहे त्यांना रोखणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

नंदिग्राम पोटनिवडणुकीसाठी पक्षाला मिळेना उमेदवार; सुवेंदू अधिकारींचे कौतुक
पक्षामध्ये केवळ नगरसेवकांचीच गळती सुरू आहे असे नाही, तर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळणेही कठीण झाले आहे. फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्निवडणुकीत पक्षाला मतदान केंद्रांवर बसण्यासाठी एजंटही मिळाले नव्हते. आता मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी नंदिग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागा जिंकल्यानंतर नंदिग्रामचा राजीनामा दिल्यामुळे तिथे पोटनिवडणूक होत आहे. मात्र, विधानसभेला पराभूत झालेले टीएमसीचे पवित्र कार यांनी पुन्हा लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेत्या डोला सेन यांच्या माध्यमातून स्थानिक नेते शेख सुफियान यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनीही तिकीट नाकारले. विशेष म्हणजे, सुफियान यांनी भाजपचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे जाहीर कौतुक करत, त्यांच्यात एक उत्तम मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असून ते नंदिग्रामचा विकास करू शकतात, असे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला.

खासदारांची उघड नाराजी आणि नेतृत्वाला आव्हान
पक्षातील वरिष्ठ स्तरावरही ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकू लागले आहे. बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तिदार यांनी पक्षाच्या एका महत्त्वाच्या पदाचा राजीनामा देऊन आपली नाराजी उघड केली आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी आमदार बिना मोंडल आणि अनिसुर रहमान बिदेश यांच्यासह थेट मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय बैठकीला हजेरी लावली. दुसरीकडे, राज्यसभा खासदार सुखेन्दू शेखर रॉय यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर जाहीरपणे टीका करण्यास सुरुवात केल्याने तृणमूल काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे.

हेही वाचा – Byju Raveendran: बायजूचे संस्थापक रवींद्रन यांच्या अडचणीत वाढ; 'या' प्रकरणात सुनावण्यात आला 6 महिन्यांचा कारावास

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number