Uday Samant: शिवसेना (शिंदे गट) नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “2019 च्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली आणि सत्ता मिळवण्यासाठी नंतर काँग्रेससोबत जाऊन बसले, हीच खरी महाराष्ट्रातील मतदारांसोबत केलेली गद्दारी आहे,” असा थेट आरोप सामंत यांनी केला. तसेच, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार ज्यांनी विकला तेच खरे गद्दार असून, ज्यांनी बाळासाहेबांसोबत गद्दारी केली त्यांनी आम्हाला गद्दारी शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
सगळं गमावल्यावर फिरून काय उपयोग? उदय सामंतांचा टोला
उद्धव ठाकरेंच्या प्रचार दौऱ्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले की, लोकशाहीत कोणी कुठेही फिरावे आणि प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु, हे सर्व कधी करावे, याचे भान असायला हवे. सगळं हातातून गेल्यानंतर आता फिरून काहीही उपयोग नाही. जर त्यांनी सुरुवातीपासूनच बाळासाहेबांचे विचार आणि पक्ष टिकवला असता, तर आज ही वेळ आली नसती. आम्ही केलेला उठाव हा गद्दारी नव्हती, तर बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी घेतलेला तो एक योग्य निर्णय होता, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले.
हेही वाचा – Uddhav Thackeray: ‘वाघाचं कातडं पांघरलेला गद्दार…’; परभणीत उद्धव ठाकरेंचा संजय जाधवांवर निशाणा
राहुल गांधींची प्रवृत्ती केवळ टीका करण्याची; देशाच्या व्यवस्थेवर सामंतांचे बोट
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना उदय सामंत म्हणाले की, राहुल गांधी यांनी आजपर्यंत केवळ देशातील यंत्रणा आणि विविध घटकांवर चिखलफेक करण्याचे काम केले आहे. देशातील एखादी संस्था किंवा सिस्टीम कशी सुधारायची, याबाबत त्यांनी कधीही विधायक मार्गदर्शन केले नाही. केवळ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार कसे वाईट आहे, हे दाखवण्याचा त्यांचा एककलमी अजेंडा असतो. परंतु, हे करत असताना ते स्वतःच्या काँग्रेस पक्षाचे अस्तित्व काय आहे, हे पूर्णपणे विसरून जातात.
पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्याची प्रवृत्ती चुकीची
उदय सामंत पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाने मांडलेली एखादी भूमिका जर देश, महाराष्ट्र किंवा शासनाच्या हिताची असेल, तर आपण तिचे नक्कीच स्वागत करू. मात्र, कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करून देशावर आणि यंत्रणेवर प्रहार करायचे, ही राहुल गांधींची प्रवृत्ती अत्यंत चुकीची आहे. सलग निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागलेल्या लोकांनी आमच्यावर आणि सरकारवर विनाकारण टीका करू नये, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.