Bawankule On Aditya Thackeray: आगामी निवडणुकांच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'ज्यांनी जन्मापासून केवळ सुखसोयी पाहिल्या, त्यांना जनतेच्या वेदना आणि विकासाची किंमत कळणार नाही. विकासासाठी जन्मापासून जनतेच्या सेवेत आयुष्य घालवावे लागते. सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासाची व्याख्या समजावू शकत नाहीत,' अशा शब्दांत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंच्या मिमिक्रीचा समाचार घेतला.
फडणवीसांची बरोबरी आदित्य ठाकरेंनी करू नये
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केल्याच्या मुद्द्यावरून बावनकुळे चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले की, 'आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्र आणि मुंबई नेमकी कोणत्या दिशेला जात आहे, हेच कळत नाहीये. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची बरोबरी आदित्य ठाकरे करू शकतात का? हे महाराष्ट्रच काय, पण स्वतः आदित्य ठाकरेंना तरी पटतंय का? निव्वळ पोकळ विनोद करून जनतेला भरकटवण्याचे हे प्रयत्न आहेत.'
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या पद्धतीवर ताशेरे ओढताना बावनकुळे यांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य दिले. राज ठाकरे भावनिक प्रश्न उपस्थित करून संभ्रम निर्माण करत आहेत. रोजगार आणि पायाभूत सुविधांऐवजी वादग्रस्त विधानांवर त्यांचा भर आहे. चुकीचे निर्णय आणि विकासाचा अभाव यामुळेच ठाकरे गटाच्या पक्षांची ताकद कमी होत चालली आहे, असा दावाही यावेळी बावनकुळे यांनी केला. दर निवडणुकीत मुंबई वेगळी करण्याची भीती दाखवली जाते, पण आता जनता अशा भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
'लाडकी बहीण' योजनेवरून काँग्रेसवर निशाणा
दरम्यान, बावनकुळे यांनी केवळ ठाकरेंवरच नाही, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसवरही हल्ला चढवला. काँग्रेसने 'लाडकी बहीण' योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातही त्यांना यश आले नाही. आता मकर संक्रांतीला महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असतानाही काँग्रेसचा विरोध कायम आहे, असा आरोप त्यांनी केला.