Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या खोट्या प्रचाराविरोधात कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे. 'एआय डीपफेक' (AI Deepfake) तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले व्हिडिओ आणि दिशाभूल करणाऱ्या मजकुराद्वारे आपली नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीची याचिका प्रविष्ट केली आहे.
मेटा आणि 'एक्स'सह अनेक घटकांवर कायदेशीर कारवाईची मागणी
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने गडकरी यांची याचिका दाखल करून घेतली असून, अंतरिम दिलासा देण्यासंदर्भातील अर्जावर लवकरच सुनावणी होणार आहे. या खटल्यात मेटा (फेसबुक व इन्स्टाग्राम) आणि 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना तसेच संबंधित युजर्सना प्रतिवादी करण्यात आले आहे. E20 धोरणाचा वापर करून गडकरी व त्यांच्या कुटुंबाने स्वतःचा फायदा करून घेतला, असा खोटा दावा इंटरनेटवर पसरवला जात आहे. यावर स्पष्टीकरण देताना गडकरी यांनी सांगितले की, हे आरोप पूर्णपणे काल्पनिक असून इथेनॉल मिश्रणाची अंमलबजावणी रस्ते वाहतूक मंत्रालय करत नसून ते पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
डीपफेक व्हिडिओ हटवण्याची आणि कठोर कारवाईची विनंती
न्यायालयाला सादर केलेल्या याचिकेत गडकरी यांनी अशी मागणी केली आहे की, डिजिटल प्लॅटफॉर्मवरून हे सर्व बनावट व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्यात यावेत. तसेच, अशा अफवांचा पुढील प्रसार रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक आदेश जारी करावेत आणि या डीपफेक मोहिमेमागे असलेल्या जबाबदार घटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.