Middle East War: मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचा फटका परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांनाही बसत आहे. हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे दुबईत अडकून पडलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) अखेर आपल्या कुटुंबासह सुरक्षितपणे भारतात परतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या या प्रकरणात लक्ष घातल्यामुळेच हा परतीचा प्रवास सुकर झाल्याची भावना स्मिताने व्यक्त केली आहे.
डोळ्यादेखत क्षेपणास्त्रांचा पाऊस; थरारक अनुभव
स्मिता गोंदकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दुबईतील त्या भयानक परिस्थितीचे वर्णन केले आहे. तिने म्हटले की, ‘खिडक्या हादरवणारे स्फोटांचे आवाज आणि रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारी क्षेपणास्त्रे अत्यंत भयावह होती. हवाई क्षेत्र बंद असल्याने अनेक विमान फेऱ्या रद्द होत होत्या. वारंवार बुकिंग करूनही भारतात येण्याचा मार्ग सापडत नव्हता.’ सोबत ज्येष्ठ नागरिक असल्याने स्मिताची चिंता अधिकच वाढली होती.
उपमुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडिओ कॉल आणि मदतीचा हात
या अत्यंत कठीण प्रसंगात स्मिताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. शिंदेंनी तातडीने व्हिडिओ कॉलद्वारे स्मिताशी संवाद साधून तिला धीर दिला आणि लवकरात लवकर मायदेशी परतण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, मंगेश देसाई आणि अतिरिक्त आयुक्त राहुल गेथे यांनी समन्वयाची जबाबदारी स्वीकारली. राहण्याची सोय, विमानतळापर्यंतचा प्रवास आणि तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने वेगाने हालचाली केल्या. यामुळे स्मिता गोंदकर अवघ्या 1 दिवसात भारतात पोहोचू शकली.
विशाखा सुभेदार यांच्या मुलालाही मदतीचे आश्वासन
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय हा कुवेतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली होती. त्या वेळीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून त्याला लवकरच भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते.
“भारतीय असल्याचा अभिमान वाटतो”
भारतात सुखरूप परतल्यानंतर स्मिताने भावूक पोस्ट शेअर केली आहे. “संकट काळात आपल्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व पाहून भारतीय असल्याचा अभिमान वाटतो,” अशा शब्दांत तिने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.