Sanjay Raut on Devendra Fadnavis: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाला 'अभूतपूर्व यश' संबोधले असतानाच, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी या विजयावर '15 हजार कोटींच्या' उधळपट्टीचा शिक्का मारत गंभीर आरोप केले आहेत.
पैशांचा महापूर; राऊतांची टीका
भाजपच्या विजयाचा गौरव करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना टोला लगावताना संजय राऊत म्हणाले की, 'भाजपच्या विजयाची हॅट्रिक असेल किंवा मॅट्रिक, पण हे यश निव्वळ पैशांच्या जोरावर मिळवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या निवडणुकीत तब्बल 15 हजार कोटी रुपये उडवले आहेत. मतदारांना पैशांचे आमिष दाखवून, पाण्यासारखा पैसा वाहून मिळवलेला हा विजय म्हणजे अभूतपूर्व पैसे वाटपाची किमया आहे.'
हेही वाचा – Devendra Fadnavis : नगरपरिषदांमधील विजय, माज अन् मात…; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सर्वोच्च न्यायालयावर निशाणा
संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. अमित शाह यांनी दिलेली शिवसेना जर तुमची असेल, तर त्यांचे पाय धुवून तीर्थ प्या, अशा कठोर शब्दांत राऊतांनी शिंदेंवर हल्ला चढवला. माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत 6 तासांत निकाल देणारे न्यायालय 40 आमदारांच्या अपात्रतेवर टाळाटाळ का करत आहे? सर्वोच्च न्यायालयावर दबाव असून तारखांवर तारखा देऊन निवडणुकांपर्यंत वेळ काढला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत?
दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर संजय राऊत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, आज सायंकाळपर्यंत 'ठाकरे बंधू' (उद्धव आणि राज ठाकरे) यांच्या युतीबाबत किंवा महाविकास आघाडीच्या मोठ्या निर्णयाबाबत घोषणा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.