Punjab Blasts: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. पंजाबमधील जालंधर येथील BSF मुख्यालय आणि अमृतसरमधील लष्करी तळाजवळ झालेल्या दोन भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. जालंधरमध्ये BSF मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूटरचा तीव्र स्फोट झाला, ज्यामुळे वाहनाने तत्काळ पेट घेतला. या घटनेच्या काही वेळातच अमृतसरच्या खासा भागातील लष्करी तळाजवळ दुसरा स्फोट झाला. हा परिसर भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असल्याने सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. सुदैवाने, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
निवडणुकीच्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांचा प्रहार
या स्फोटांनंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. “हे स्फोट म्हणजे 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिथे निवडणुका असतात तिथेच अशा घटना का घडतात, असा प्रश्न विचारत भाजपने बंगालमधील यशानंतर केलेल्या ‘नेक्स्ट पंजाब’ या सोशल मीडिया पोस्टचा संदर्भ दिला. भाजपला आता स्फोटांच्या माध्यमातून मते मिळवायची आहेत का, असा खळबळजनक आरोप करत मान यांनी राजकीय वातावरण तापवले आहे.
ਪੰਜਾਬ ਦੀ ਧਰਤੀ 'ਤੇ ਨਫ਼ਰਤ ਦੇ ਬੀਜ ਬੀਜਣ ਵਾਲੇ ਕਦੇ ਸਫ਼ਲ ਨਹੀਂ ਹੋਣਗੇ..ਭਾਜਪਾ ਆਪਣੀਆਂ ਘਿਣਾਉਣੀਆਂ ਚਾਲਾਂ ਤੇ ਡਰ ਦੀ ਰਾਜਨੀਤੀ ਤੋਂ ਬਾਜ਼ ਆਵੇ। ਪੰਜਾਬ ਗੁਰੂਆਂ-ਪੀਰਾਂ ਦੀ ਧਰਤੀ ਹੈ, ਇੱਥੇ ਬੰਗਾਲ ਵਾਲੇ ਫਾਰਮੂਲੇ ਨਹੀਂ ਚੱਲਣੇ। ਪੰਜਾਬੀ ਆਪਣੀ ਅਮਨ-ਸ਼ਾਂਤੀ ਦੀ ਰਾਖੀ ਕਰਨਾ ਚੰਗੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਾਣਦੇ ਹਨ.. pic.twitter.com/Z1jCkHDQee — Bhagwant Mann (@BhagwantMann) May 6, 2026
सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आणि तपासाला वेग
स्फोटांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंजाबमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अमृतसरचे एसपी आदित्य एस. वॉरियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉम्ब निकामी पथक, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाद्वारे घटनास्थळावरून पुरावे संकलित केले जात आहेत. अमृतसरमधील स्फोट हा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या ग्रेनेडमुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पंजाब पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.