Vasant More: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडीतील (MVA) धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. शरद पवार गटाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी मित्रपक्षावर शेलक्या शब्दांत घणाघात केला आहे. “हा कोणताही घोडेबाजार नसून 100 टक्के मॅच फिक्सिंग आणि सेटलमेंट आहे. पुण्यात आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असून, शिवसेनेने आता महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
पुण्याची जागा बिनविरोध; काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटही आक्रमक
पुण्याची विधानपरिषदेची जागा महायुतीत अजित पवार गटाला सुटली होती. भाजपमधून ऐनवेळी घड्याळ हाती घेतलेल्या विक्रम काकडे यांनी निष्ठावंतांना बाजूला सारत उमेदवारी मिळवली. दुसरीकडे, मविआकडून शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील रिंगणात होते. मात्र, ऐनवेळी शरद पवारांच्या सूचनेनुसार पाटील यांनी माघार घेतली, तर भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनीही अर्ज काढल्याने पुण्याची निवडणूक बिनविरोध झाली. या घडामोडीनंतर आधी काँग्रेसने शरद पवार गटावर दगाफटक्याचा आरोप केला होता, आणि आता वसंत मोरेंनी यावर कडाडून टीका केली आहे.
“दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच; बारामतीची भाऊबंदकी पुण्यात कशाला?”
वसंत मोरे यांनी शरद पवार गटाच्या भूमिकेवर थेट बोट ठेवत अंतर्गत साट्यालोट्याचा आरोप केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीत आमचा सलग तिसऱ्यांदा विश्वासघात झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आतून एकच असून ही केवळ त्यांची ‘भाऊबंदकी’ सुरू आहे. त्यांना भाऊबंदकी करायची असेल तर ती बारामतीत करावी, पुण्यात त्याचे प्रयोग कशाला? ठाण्यात मदत केली म्हणून साताऱ्यात शिवसेनेला सहकार्य करणार, असे गणित मांडले जाते. पण पुण्यात शरद पवार गटाचे अवघे तीन नगरसेवक असताना त्यांनी हा निर्णय घेताना विचार करायला हवा होता.”
हेही वाचा – K. Annamalai: तमिळनाडूच्या राजकारणात ‘सिंघम’चे नवे वादळ; अण्णामलाईंचा भाजपला रामराम, नव्या पक्षाची घोषणा
मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
मोरे पुढे म्हणाले की, शरद पवार गटाच्या अशा एकतर्फी निर्णयामुळे महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक निवडणुकीत जर अशीच सेटलमेंट होणार असेल, तर मविआचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही. “आम्ही पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असा स्पष्ट सल्ला मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या या अंतर्गत तडजोडीचे गंभीर परिणाम आगामी काळात संपूर्ण आघाडीला भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
पडद्यामागे फिरली चक्रं; अशी झाली ‘सेटलमेंट’
सुरुवातीला ही लढत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट होणार असल्याचे चित्र होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली आणि संपूर्ण चित्रच बदलले. पवारांच्या आदेशानंतर श्रीकांत पाटील आणि डमी उमेदवार तुषार कामठे यांनी अर्ज मागे घेतला. दुसरीकडे, भाजप आमदार राहुल कुल यांच्या मध्यस्थीनंतर बंडखोर प्रदीप कंद यांनीही शेवटच्या काही मिनिटांत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून माघार घेतली. या नाट्यमय तडजोडीमुळे विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला असला, तरी मविआमध्ये मात्र यामुळे मोठी दरी निर्माण झाली आहे.