South Actress Divorce: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हंसिका आणि तिचा पती सोहेल कथुरिया यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला असून त्यांचे नाते संपुष्टात आले आहे. मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने या जोडप्याच्या घटस्फोटाची याचिका मंजूर केली असून, लग्नाच्या अवघ्या काही वर्षांनंतर हे जोडपे वेगळे झाले आहे.
पॅरिसमध्ये प्रपोजल आणि शाही विवाह
हंसिका आणि सोहेल यांचे नाते एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखे सुरू झाले होते. सोहेलने पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर हंसिकाला अत्यंत रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये जयपूरच्या ऐतिहासिक मुंडोटा फोर्ट येथे एका भव्य आणि शाही समारंभात हे दोघे विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या या लग्नाचे संपूर्ण दस्तऐवजीकरण 'हंसिका लव्ह शादी ड्रामा' नावाच्या वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोरही आले होते.
नाते तुटण्यामागचे नेमके कारण काय?
हंसिका मोटवानीचे वकील अदनान शेख यांच्या म्हणण्यानुसार, दोघांच्या स्वभावातील तफावत आणि विचारांमधील विसंगती (Incompatibility) हे नाते तुटण्याचे मुख्य कारण ठरले. याशिवाय, दोघांच्या करिअरमधील व्यग्रता आणि वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमुळे त्यांच्यात अंतर वाढत गेले. जरी हंसिका किंवा सोहेल यांपैकी कोणीही अधिकृतपणे अद्याप यावर भाष्य केले नसले, तरी गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटो नसल्याने त्यांच्यातील दुराव्याची चर्चा रंगली होती.
हेही वाचा – Onkar Bhojane: कोकण कोहिनूर ओंकार भोजने पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘सालबर्डी’मध्ये साकारणार दमदार भूमिका
वादाच्या भोवऱ्यात राहिले होते लग्न
हंसिका आणि सोहेलचे नाते सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिले होते. सोहेल कथुरियाचे हे दुसरे लग्न होते आणि विशेष म्हणजे त्याची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची जवळची मैत्रीण होती. जेव्हा हंसिका आणि सोहेलच्या लग्नाची बातमी समोर आली, तेव्हा हंसिकावर तिच्या मैत्रिणीचे घर तोडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. मात्र, हंसिकाने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.