Ganesh Naik Speech: नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. ‘चोरांची नजर नेहमी खाली असते, ते कधीच वर मान करून चालू शकत नाहीत, अशा खोचक शब्दांत भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवी मुंबईत ‘शिंदेसेना’ विरुद्ध ‘भाजप’ असा थेट सामना रंगल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान दिले जात आहे. मूळ भाजपवासी आमच्यासोबत आहेत, असा दावा शिंदेसेनेने केल्यानंतर नाईक कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महायुतीत असूनही मुंबई-ठाण्याबाहेर एकमेकांविरोधात प्रचार करायचा नाही, हा अलिखित नियम आता धुळीला मिळताना दिसत आहे.
‘हरामचा पैसा आणि मतांची भीक’
गणेश नाईक यांनी प्रचारादरम्यान शिंदे गटावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. ‘त्यांच्या पार्टीचा पैसा हरामचा असून ते मतांसाठी भीक मागतात,’ असे म्हणत त्यांनी शिंदेंना डिवचले. नवी मुंबईची निवडणूक केवळ पैशाच्या जोरावर जिंकता येणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
‘वरून कीर्तन, आतून तमाशा’; शिंदेंचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनीही नाईकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. नवी मुंबईत मुख्य रस्ते वरून चांगले दिसतात, पण अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. नाईकांचा कारभार म्हणजे ‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा’ असा आहे, अशी बोचरी टीका शिंदेंनी केली. नवी मुंबईत परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेला (शिंदे गट) निवडून देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.