Jantar Mantar Protest: केंद्र सरकारसोबतच्या संवादासाठी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) तयार असली, तरी त्यांनी चर्चेच्या ठिकाणाबाबत अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. बुधवारी (22 जुलै) पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी स्पष्ट केले की, यापुढे कोणत्याही मंत्र्याच्या वा नेत्याच्या निवासस्थानी किंवा शासकीय कार्यालयात चर्चा केली जाणार नाही. सरकारने चर्चेसाठी थेट जंतरमंतर येथे यावे किंवा 'कॉन्स्टिट्यूशन क्लब'सारख्या तटस्थ ठिकाणी बैठकीचे आयोजन करावे, अशी अट त्यांनी घातली आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवसापासून सरकारने गांभीर्याने संवाद साधायला हवा होता, असे सांगत त्यांनी चर्चेतूनच मार्ग निघू शकतो यावर विश्वास व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी पार पडली पहिली फेरी
यापूर्वी सोमवारी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी CJP च्या शिष्टमंडळाची आणि सरकारची पहिली औपचारिक बैठक पार पडली होती. CJP कडून आशुतोष रंका आणि सौरव दास यांनी 2 तासांच्या कालावधीत 2 वेळा नड्डा यांची भेट घेतली होती. सकाळी 11:50 च्या सुमारास सुरू झालेली ही तोंडी चर्चा संध्याकाळी 4 वाजता निवेदनाच्या हस्तांतरणाने पूर्ण झाली. या बैठकीत आंदोलकांनी परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी लावून धरली.
मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा
संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांनी अश्रूधुराचा वापर आणि लाठीचार्ज केल्यानंतर हा थेट संवाद घडून आला होता. बैठकीनंतर जे.पी. नड्डा यांनी आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र, वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करण्याचे निव्वळ आश्वासन मिळाले असून कोणतीही ठोस कृती झालेली नाही, असे CJP ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत जंतरमंतरवरून हे आंदोलन असेच आक्रमकपणे सुरू राहील, असा ठाम पवित्रा संघटनेने घेतला आहे.