Solapur Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील दोन बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, हा बदल सोलापूरच्या निकालावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो.
बड्या नेत्यांचे पक्षांतर
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यू. एन. बेरिया (माजी महापौर) आणि नलिनी चंदेले (माजी महापौर) या दोन माजी महापौरांसोबतच अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पक्षांतर केल्याने शरद पवार गटाची ताकद सोलापुरात कमकुवत झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – Pimpri Chinchwad Election : पिंपरी-चिंचवडमध्ये 'राष्ट्रवादी'ची युती तुटली ! अमोल कोल्हेंच्या मध्यस्थीला अपयश
राज्यातील युतीचा पेच कायम
एककीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मैदानात ओढाताण सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची युती निश्चित मानली जात आहे. काही शहरांत अजित पवार गट या युतीचा भाग असेल, तर काही ठिकाणी ते स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. जिथे भाजप-शिंदे गटाशी जुळणार नाही, तिथे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबत चाचपणी करत आहेत. मात्र, मुंबईत अजित पवार गटाने 'स्वबळावर' लढण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळ वाढला आहे.
दरम्यान, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर आता महापालिकेतही पक्षांतराचे वारे वेगाने वाहत आहेत. सोलापूरमधील या मोठ्या धक्क्यानंतर आता शरद पवार गट आपली रणनीती कशी बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.