Ayushman Bharat Scheme: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजनेचा लाभ घेणाऱ्या कोट्यवधी नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील वाढती फसवणूक आणि बनावट कार्डांचे पेव रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) नियमावलीत मोठे बदल केले आहेत. आता केवळ पात्र आणि गरजू रुग्णांनाच मोफत उपचार मिळावेत, यासाठी 'बेनिफिशियरी आयडेंटिफिकेशन सिस्टम' अधिक कडक करण्यात आली आहे.
आता 'आधार' कार्डाशिवाय पर्याय नाही
योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारने आधार आधारित ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केले आहे. लाभार्थ्याची माहिती आधार कार्डाशी 100 टक्के जुळली तरच नवीन कार्ड जारी होईल किंवा जुने कार्ड सक्रिय राहील. मर्जीनुसार नवीन नावे जोडण्याचा पर्याय आता कायमचा बंद झाला आहे. आता केवळ 2011 च्या जनगणनेनुसार पात्र असलेल्या कुटुंबातच नियमानुसार नवीन सदस्यांचा समावेश करता येईल.
एआय (AI) ठेवणार गैरव्यवहारांवर नजर
बनावटगिरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. SACHIS च्या सीईओ अर्चना वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयास्पद कार्डांची ओळख पटवण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) मदत घेतली जात आहे. एखादे कार्ड संशयास्पद आढळल्यास सिस्टीम आपोआप त्यावरील मोफत उपचारांची सुविधा ब्लॉक करते. आतापर्यंत 61 हजारांहून अधिक कार्डांची चौकशी सुरू असून, गैरप्रकारात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येत आहे.
तुमचे कार्ड सुरू ठेवण्यासाठी हे करा
जर तुम्ही आयुष्मान कार्ड काढले असेल, पण अजूनही KYC पूर्ण केले नसेल, तर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपत्कालीन वेळी तुम्हाला मोफत उपचार मिळण्यात अडचणी येतील. त्यामुळे तातडीने जवळच्या केंद्रावर जाऊन किंवा अधिकृत ॲपद्वारे आपले ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.