Supriya Sule On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कौटुंबिक दुःख आणि राजकीय घडामोडींवर अत्यंत संवेदनशील भाष्य केले. दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेपासून ते सुनेत्रा पवार यांची पालकमंत्री म्हणून झालेली नियुक्ती, अशा विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
विलिनीकरणावर महत्त्वाचं भाष्य
गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्यात आणि माझ्या भावामध्ये (अजित पवार) विलिनीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. आमच्यात नेमके काय बोलणे झाले, हे दादांना पूर्णपणे ठाऊक होते. आज अनेक नेते यावर बोलणे टाळत असले, तरी ते एक वास्तव आहे आणि ते कधीही बदलणार नाही. अनेक वेळा लोकांना मी हे बोललेलं आवडत नाही.” तसेच यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपल्या मुलीचं लग्न जमल्याचंही माध्यमांना सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘आज दादा असता तर त्यानेचं हे सर्वांना सांगितलं असतं.’
सुनेत्रा वहिनींच्या नियुक्तीवर प्रतिक्रिया
पुण्याच्या नवनियुक्त पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या संमिश्र भावना व्यक्त केल्या. “सुनेत्रा वहिनींवर नवीन जबाबदारी आल्याचा मला सार्थ आनंद आहे, पण त्याच वेळी अजितदादा आज आपल्यात नाहीत याचे अतोनात दुःखही आहे. सध्या माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात आनंद, अशी स्थिती आहे,” असे भावूक उद्गार त्यांनी काढले. अजितदादांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
खासदार सुळे यांनी वडील शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांच्या टीमच्या देखरेखीखाली त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, शरद पवार यांना उद्या (शुक्रवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
संकटकाळात राजकीय मतभेद विसरले; मोदी-शाहांचे मानले आभार
अजित पवार यांच्या निधनानंतर आणि शरद पवार यांच्या आजारपणाच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी पवार कुटुंबाला आधार दिला. “या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी फोन करून वडिलांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. संकटकाळात माणुसकी जपत साथ देणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांची मी ऋणी आहे,” असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी नमूद केले.