महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या तीन पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे या दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच, गणेशोत्सवातील डीजेविरोधात लढा देणारे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे विद्यानंद बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा समोर आली आहे.
विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. अशातच प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे विद्यानंद बापट निवडणुकीच्या मैदानात उतरणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Rajya Sabha Election : भाजपला धक्का की वर्चस्व कायम?, १० जागांसाठी रंगणार मोठा सामना
यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ता अॅड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “आता माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीची सविस्तर ओळख करून देण्याची गरज नाही. ‘विद्यानंद बापट’—ध्वनी प्रदूषणाच्या राक्षसाविरुद्ध उभे असलेले निर्भय योद्धे. ते एक असे नायक बनले आहेत, जे अनेक लोकांच्या मनातील दुःखांना वाचा फोडतात आणि सणांचे विकृत स्वरूप, त्यातील अश्लीलता समोर आणतात.”
“तर ज्ञानसंपन्न, संस्कृतमध्ये पारंगत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक समस्येची जाणीव असलेले विद्यानंद बापट आज प्रत्येक घरात एका प्रिय सदस्यासारखे झाले आहेत. भाषेचा दर्जा घसरू न देता नेमके बोलणारे आणि समाजाला जागतिकीकरण करण्याची क्षमता असलेले विद्यानंद बापट यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का? तुम्हाला काय वाटते?”
माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षसा विरोधात निर्भयपणे उभा असणारा 'विद्यानंद बापट'. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर – – -… pic.twitter.com/HDlXMat1Ks — Asim Sarode (@AsimSarode) September 22, 2026