Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत हातमिळवणी करून घुसखोरांना आपली 'व्होट बँक' बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप शाह यांनी केला. "हा देश म्हणजे कोणती धर्मशाळा नाही. या देशात केवळ तेच लोक राहू शकतात जे इथले नागरिक आहेत," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला. तसेच, देशातील प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याला बाहेर काढले जाईल, असा पुनरुच्चारही शाह यांनी यावेळी केला.
'गट' संपला, आता एकच शिवसेना
ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठ्या फुटीचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, "पूर्वी लोकांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा 'शिंदे गट' असा वेगळा उल्लेख करावा लागायचा. परंतु, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता कोणताही गट अस्तित्वात नसून, फक्त आणि फक्त एकच शिवसेना आहे आणि तिचे नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत."
ठाकरे गटातील संभाव्य बंडाचा संदर्भ
अमित शाह यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) मोठ्या राजकीय संकटाचा सामना करत आहे. ठाकरे गटातील किमान सहा लोकसभा खासदार बंडाच्या तयारीत असून ते सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याच राजकीय घडामोडींचा धागा पकडत शाह यांनी ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली.
हेही वाचा – Omraje Nimbalkar : 'त्या पाच खासदारांची धाकधूक वाढली'; ओमराजे निंबाळकरांचं पेचात टाकणारं वक्तव्य
अस्तित्वासाठी काँग्रेसशी तडजोड केल्याचा आरोप
उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेवर प्रहार करताना अमित शाह म्हणाले की, आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धवजी काँग्रेस नेत्यांच्या पंक्तीला जाऊन बसले आहेत. घुसखोरांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्यांना देशाची सुरक्षा आणि अस्मितेशी तडजोड करू दिली जाणार नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या धोरणांवर कडक टीका केली.