Aditya Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीने चार वादग्रस्त प्रस्तावांना तूर्तास ब्रेक लावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “अधिवेशन सुरू असताना मुंबईतील एका मैदानाच्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्या कानावर आले आहे की, या संपूर्ण प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. काल मी पत्रकार परिषदेत भाजपलाही जाहीर आवाहन केले होते की, जर या भूखंड लाटण्याच्या आणि खाजगीकरणाच्या प्रस्तावांना तुमचा पाठिंबा नसेल, तर तुम्ही याला विरोध केला पाहिजे. जर आज त्यांनी खरोखरच या विषयाची दखल घेतली असेल, तर मला यात कोणताही कमीपणा वाटत नाही. हे सर्व वादग्रस्त प्रस्ताव जेव्हा पूर्णपणे रद्द होतील, तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांचे जाहीरपणे आभार मानेल.”
रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणाचा ‘तो’ भयानक प्रस्ताव
या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. विशेषतः मुंबई मनपाच्या उपनगरीय रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांच्या (Blood Banks) पीपीपी मॉडेलचा उल्लेख करत ते म्हणाले, “या सर्व प्रस्तावांमध्ये अत्यंत भयानक प्रस्ताव होता तो म्हणजे रक्तपेढ्यांच्या खाजगीकरणाचा. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आजपर्यंत सर्व रुग्णांना मोफत रक्त पुरवले जाते. सामाजिक संस्था, एनजीओ आणि विशेषतः शिवसेना नेहमीच मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे आयोजित करते. मुंबईकरांनी स्वतःहून दिलेले हे रक्त खाजगी हातात सोपवून, भविष्यात प्रत्येक रक्ताच्या पिशवीसाठी रुग्णांकडून कमीत कमी 1100 रुपये उकळण्याचा आणि महागाईच्या नावाखाली हा दर आणखी वाढवण्याचा हा डाव होता, ज्याला आम्ही कडाडून विरोध केला.”
‘वर्षा’ बंगल्याच्या शेजारील हरित पट्ट्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न
आदित्य ठाकरे यांनी सुधार समितीने मागे घेतलेल्या इतर प्रस्तावांवरूनही गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “जनसामान्यांना आणि मुंबईकरांना बाहेर ठेवून स्वतःच्या फायद्यासाठी मोकळे मैदान ताब्यात घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. तसेच ‘वर्षा’ बंगल्यापासून अवघ्या काही फुटांवर असलेल्या एका सोसायटीच्या बाजूचा हरित पट्टा (Green Zone) थेट रहिवासी क्षेत्रात कन्व्हर्ट करण्याचा आणखी एक प्रस्ताव आणला गेला होता. आम्ही हे सर्व प्रस्ताव उधळून लावले आहेत. सुधार समितीने हे प्रस्ताव सध्या प्रशासनाकडे परत पाठवले असले, तरी ते केवळ परत पाठवून चालणार नाही, तर ते कायमचे रद्द करणे गरजेचे आहे. हा मुंबईकरांच्या लढ्याचा पहिला टप्पा यशस्वी ठरला असून, यापुढेही महापालिकेच्या प्रत्येक हालचालीवर आमची बारीक नजर असेल.”