Thackeray Manifesto: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली पकड मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) आज मुंबईकरांसाठी आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला टक्कर देण्यासाठी ठाकरेंनी ‘स्वाभिमान योजना’ जाहीर केली असून, मुंबईच्या सत्तेसाठी एक सर्वसमावेशक विकास आराखडा मांडला आहे. आज शिवसेना भवनात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे 227 उमेदवारांना विजयाचा कानमंत्र दिला.
ठाकरेंचा मुंबई ‘मेगाप्लान’: प्रमुख घोषणा
मुंबईतील प्रत्येक वर्गाला साद घालण्यासाठी ठाकरेंनी खालील मोठ्या घोषणा केल्या आहेत:
स्वाभिमान निधी: नोंदणीकृत घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
प्रॉपर्टी टॅक्स माफी: मुंबईतील 700 चौरस फुटांपर्यंतच्या सर्व घरांचा मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन दिले आहे.
तरुणांसाठी पाठबळ: सुशिक्षित बेरोजगारांना आणि गरजू तरुणांना स्वयंरोजगारासाठी 1 लाख रुपयांचा विशेष साहाय्यता निधी दिला जाणार आहे.
मासाहेब किचन्स: कष्टकऱ्यांसाठी अवघ्या 10 रुपयांत पोटभर नाश्ता आणि दुपारचे जेवण उपलब्ध करून दिले जाईल.
महिला सुरक्षा व सुविधा: दर 2 किमी अंतरावर आधुनिक स्वच्छतागृहे आणि महिलांच्या मुलांसाठी दर्जेदार ‘पाळणघरं’ (Crèches) उभारली जातील.
मच्छीमार समुदायासाठी सवलती: कोळी बांधव आणि मच्छीमार महिलांना अर्थसाहाय्य देऊन परवान्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सुलभ केली जाईल.
हेही वाचा – Haribhau Rathod On Rahul Narvekar : “मला त्यांनी धमकी दिली” राहुल नार्वेकरांवर हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप
आदित्य आणि अमित ठाकरेंचे संयुक्त ‘फिल्डिंग’
दरम्यान, शिवसेना भवनात आज अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शिवसेना (UBT), मनसे आणि मित्रपक्षांच्या 227 उमेदवारांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी प्रचाराची दिशा स्पष्ट केली. विधानसभेत बसलेल्या फटक्यातून धडा घेत, दोन्ही भावांनी समन्वय साधून स्थानिक मुद्द्यांवर भर देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.
हेही वाचा – Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…
महायुतीच्या ‘लाडकी बहीण’ला प्रत्युत्तर
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयाचे मुख्य कारण ‘लाडकी बहीण’ योजना मानली जाते. याचीच पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये, म्हणून ठाकरेंनी मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिला आणि कष्टकऱ्यांसाठी स्वतंत्र योजनांचे ‘ब्रह्मास्त्र’ बाहेर काढले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून मुंबईची निवडणूक आता अधिक रंजक झाली आहे.