Pune Metro Line 3: पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'पुणे मेट्रो 3३' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेला हिंजवडी ते शिवाजीनगर हा 'पिंक लाईन' प्रकल्प आता जून अखेरीस प्रवाशांच्या सेवेत येण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला मार्च आणि नंतर मे महिन्याचा मुहूर्त हुकल्यानंतर, आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात मेट्रो धावणार आहे.
पहिल्या टप्प्यात 'मान' ते 'बालेवाडी' प्रवास
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये संपूर्ण 23 किलोमीटरचा मार्ग खुला न करता, तो टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल. पहिल्या टप्प्यात आयटी हब असलेल्या हिंजवडीतील मान ते बालेवाडी स्टेडियम दरम्यानची 12 स्थानके प्रवाशांसाठी खुली केली जातील. सध्या या मार्गावरील सिव्हिल वर्क पूर्ण झाले असून सुरक्षा चाचण्यांना वेग आला आहे.
सुरक्षा आयुक्तांच्या हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा
मे महिन्याच्या अखेरीस 'मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त' (CMRS) या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक निरीक्षण करणार आहेत. त्यांच्याकडून सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच जूनच्या अखेरीस प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होईल. उर्वरित शिवाजीनगरपर्यंतचा मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी काही अवधी लागणार असून, ऑक्टोबर 2026 पर्यंत संपूर्ण मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
एकूण 23.23 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग (Elevated Route) हिंजवडीतील आयटी पार्कला थेट शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे. यामुळे दररोज तासनतास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या आयटी प्रोफेशनल, विद्यार्थी आणि नोकरदारांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार आहे. सध्या बालेवाडीच्या पुढील स्थानकांवर कामाचा वेग वाढवण्यात आला असून, ऑक्टोबरमध्ये संपूर्ण मार्गिका सुरू झाल्यावर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होईल.