BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयाचा निर्धार केलेल्या महायुतीला मतदानापूर्वीच मोठा तांत्रिक धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच, दोन प्रभागांमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार तांत्रिक कारणांमुळे स्पर्धेतून बाद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय गणिते बदलली असून विरोधकांचे पारडे जड झाले आहे.
15 मिनिटांचा उशीर महागात पडला
सर्वात मोठी धक्कादायक घटना प्रभाग क्रमांक 212 मध्ये घडली. भाजपच्या अधिकृत उमेदवार मंदाकिनी खामकर यांना पक्षाने 'एबी' फॉर्म दिला होता, परंतु निवडणूक कार्यालयात पोहोचण्यास त्यांना अवघ्या 15 मिनिटांचा उशीर झाला. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर त्या पोहोचल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. परिणामी, पक्षाचे तिकीट खिशात असूनही खामकर यांना निवडणूक रिंगणाबाहेर राहावे लागले आहे.
कागदपत्रांच्या त्रुटीमुळे प्रभाग 211 मध्येही रिक्त जागा
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक 211 मध्येही महायुतीची मोठी फजिती झाली आहे. येथील उमेदवाराने वेळेत कागदपत्रांची पूर्तता न केल्याने किंवा तांत्रिक त्रुटीमुळे या जागेवर महायुतीचा कोणताही अधिकृत उमेदवार उरलेला नाही. मतदानापूर्वीच दोन जागांवर उमेदवार नसल्याने आता भाजप-शिंदे गटाला येथे अपक्ष किंवा अन्य उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवू शकते. महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच शेवटच्या क्षणापर्यंत सुटला नव्हता. अखेरच्या तासात जागावाटप निश्चित झाल्याने पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट फोनवरून 'एबी' फॉर्म नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या घाईघाईत झालेल्या नियोजनाचा फटका उमेदवारांना बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
हेही वाचा – BJP Mumbai Candidate List: मुंबईत भाजपकडून 136 उमेदवारांची यादी जाहीर; नार्वेकरांच्या घरात 3 जणांना तिकीट
विरोधकांसाठी मोकळे रान
महायुतीच्या या 'सेल्फ गोल'मुळे प्रभाग 211 आणि 212 मध्ये ठाकरे गट-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार गट) महाविकास आघाडीच्या उमेदवारांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. आता या दोन जागांवर महायुती कोणाला पाठिंबा देऊन विरोधकांना रोखणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.