Thalapathy Vijay Oath Ceremony: तामिळनाडूमध्ये ‘विजय’ पर्व! अखेर जोसेफ विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; उद्या होणार शपथविधी सोहळा

दिवसभर चाललेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.

Thalapathy Vijay Oath Ceremony: तामिळनाडूमध्ये ‘विजय’ पर्व! अखेर जोसेफ विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; उद्या होणार शपथविधी सोहळा

Thalapathy Vijay Oath Ceremony: तामिळनाडूच्या राजकारणात एका नवीन अध्यायाची सुरुवात होत असून, ‘तामिळगा वेट्री कझगम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय उद्या, शनिवारी सकाळी 11:00 वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शुक्रवारी दिवसभर चाललेल्या वेगवान राजकीय घडामोडींनंतर, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापनेचे अधिकृत निमंत्रण दिले आहे. या सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भव्य ‘राज्याभिषेक’
विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडणार आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवून 108 जागा जिंकणाऱ्या TVK पक्षाच्या या यशाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो समर्थक चेन्नईत दाखल झाले आहेत. विजय यांनी राज्यपालांकडे पाठिंबा देणाऱ्या आमदारांची अधिकृत यादी सोपवली असून, शपथविधीनंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मित्रपक्षांच्या पाठिंब्याने गाठला बहुमताचा आकडा
तामिळनाडूच्या 234 सदस्यांच्या विधानसभेत सरकार स्थापनेसाठी 118 जागांची आवश्यकता आहे. 108 जागा मिळवलेल्या TVK ला सुरुवातीला 10 जागांची कमतरता भासत होती. मात्र, काँग्रेस (5 जागा), CPI (2 जागा), CPI(M) (2 जागा) आणि VCK (2 जागा) यांनी आपला पाठिंबा जाहीर केल्याने TVK ची सदस्यसंख्या 119 वर पोहोचली आहे. याशिवाय AMMK आणि IUML च्या पाठिंब्यामुळे हा आकडा 121 पर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या समर्थनामुळे सत्तेचे समीकरण विजय यांच्या बाजूने झुकले आहे.

हेही वाचा – Suvendu Adhikari: सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड; अमित शाह म्हणाले, ‘207 आमदारांना पाहून माझे हृदय…’

काँग्रेस-DMK युती संपुष्टात; नवीन राजकीय समीकरणे
राज्यात काँग्रेसने TVK ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे DMK सोबतची त्यांची अनेक वर्षांची युती संपुष्टात आली आहे. CPI(M) ने स्थिर सरकारसाठी बिनशर्त पाठिंबा दिला आहे, तर CPI ने ‘धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी प्रशासन’ देण्याच्या अटीवर पाठिंबा दर्शवला आहे. या नवीन आघाडीमुळे तामिळनाडूमध्ये आता ‘द्रविडी’ राजकारणाच्या दोन मुख्य प्रवाहांव्यतिरिक्त ‘थलपती’ विजय यांच्या नेतृत्वाखालील तिसरा मोठा पर्याय सत्तेत आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number