Omraje Nimbalkar Post: धाराशिवचे शिवसेना पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने आपले दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावरील एका अत्यंत भावुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनातील वेदना बोलून दाखवल्या आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या गाजलेल्या हत्याकांड खटल्याचा निकाल नुकताच समोर आला असून, त्यानंतर ओमराजे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे.
दीर्घ न्यायालयीन लढाईत धक्का; सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
गेल्या दोन दशकांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल अखेर शनिवारी जाहीर झाला. मात्र, या निकालामुळे निंबाळकर कुटुंबीयांना मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. हा निकाल ओमराजे आणि त्यांच्या परिवाराच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विपरीत लागल्याचे दिसून येत आहे.
“सूर्य सत्याचा उद्या उगवेल…”; कवितेच्या ओळींमधून सूचक संदेश
वडिलांच्या मृत्यूच्या निकालाचा धक्का आणि दुसऱ्याच दिवशी आलेला ‘फादर्स डे’ अशा अत्यंत संवेदनशील मनःस्थितीत ओमराजे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पानावर वडिलांसोबतचा एक जुना कौटुंबिक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी, “भोवताली दाटला अंधार दुःखांचा जरी… सूर्य सत्याचा उद्या उगवेल खात्री आहे…” या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. या मोजक्या आणि सूचक शब्दांमधून त्यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत न्यायावरील आपला विश्वास अद्याप कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या निकालापूर्वी, कायदेशीर प्रक्रियेत दिलासा मिळवण्यासाठी ओमराजे हे सत्ताधारी शिंदे गटात सामील होणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता निकाल विरोधात गेल्यामुळे ओमराजे यांची पुढील राजकीय दिशा काय असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, आज सकाळीच ओमराजे पुण्यातून आपल्या असंख्य समर्थकांसह धाराशिवकडे रवाना झाले आहेत. तिथे पोहोचून ते आपल्या सहकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील आणि त्यानंतरच आपली पुढील अधिकृत भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती मिळत आहे.