Rajya Sabha Party Wise Strength: दिल्लीच्या राजकारणातील 'आप'च्या अंतर्गत फुटीचे पडसाद आता थेट संसदेच्या वरिष्ठ सभागृहात, म्हणजेच राज्यसभेत उमटले आहेत. खासदार राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली 7 खासदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने राज्यसभेचे संपूर्ण गणितच बदलले आहे. यामुळे सत्ताधारी भाजप अधिक शक्तिशाली झाला असून, आम आदमी पक्षाची अवस्था आता चौथ्या क्रमांकावरून थेट खाली घसरली आहे.
भाजपची 'सेंच्युरी' पार, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर
या मेगा-भरतीनंतर राज्यसभेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांची संख्या आता 113 वर पोहोचली आहे. यामुळे सभागृहात महत्त्वाचे निर्णय घेताना सरकारची स्थिती अधिक भक्कम झाली आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस 29 खासदारांसह दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
इतर पक्षांची स्थिती:
राज्यसभेत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस 13 खासदारांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. तामिळनाडूच्या डीएमकेकडे 8 खासदार आहेत. महाराष्ट्रातील पक्षांचा विचार करता, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिंदे यांची शिवसेना 2, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा प्रत्येकी 1 खासदार सभागृहात आहे. तथापी, इतर प्रमुख पक्षाचे बिजू जनता दल (6), अण्णाद्रमुक (5), जनता दल युनायटेड (4), आणि समाजवादी पक्ष (4) खासदार आहेत.
'आप'ची ऐतिहासिक घसरण
काही दिवसांपूर्वीपर्यंत राज्यसभेत 10 खासदारांसह चौथ्या क्रमांकाची मोठी शक्ती असलेला आम आदमी पक्ष आता केवळ 3 खासदारांवर येऊन ठेपला आहे. या बंडाने अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला राष्ट्रीय राजकारणात मोठा तांत्रिक आणि राजकीय धक्का दिला आहे.