Eknath Shinde Reaction: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे. ‘जनतेला काम करणारा माणूस हवा असतो, घरात बसणारा नाही. म्हणूनच मतदारांनी घरात बसणाऱ्यांना या निवडणुकीत कायमचे घरी बसवले आहे,’ अशा शब्दांत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला.
भाजपची ‘सेंच्युरी’ तर शिवसेनेची ‘हाफ सेंच्युरी’!
निकालांवर समाधान व्यक्त करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला, तसाच कल या स्थानिक निवडणुकांमध्येही पाहायला मिळाला आहे. भाजपने 100 पेक्षा जास्त जागा जिंकून ‘सेंच्युरी’ पूर्ण केली आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. आमच्या शिवसेनेनेही 50 पेक्षा अधिक जागा जिंकून दिमाखात ‘हाफ सेंच्युरी’ केली आहे. हा विजय आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोठी नांदी ठरणार आहे.’
शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित नाही
शिवसेनेच्या वाढत्या ताकदीवर भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘आम्ही कमी जागा लढवूनही सर्वाधिक ‘स्ट्राईक रेट’ राखला आहे. आज संपूर्ण महाविकास आघाडीच्या जागांची बेरीज केली, तरी त्या शिवसेनेच्या एकूण जागांपेक्षा कमी भरतात. आमची शिवसेना आता फक्त ठाण्यापुरती राहिलेली नाही, तर ती ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ घराघरात पोहोचली आहे. लहान शहरांमध्येही धनुष्यबाण वेगाने पोहोचला आहे, हीच आमच्या कामाची खरी पावती आहे.’
◻️LIVE | ?️ 21-12-2025 ? ठाणे ? पत्रकारांशी संवाद https://t.co/somkEhMVth — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 21, 2025
कार्यकर्त्यांचा विजय आणि ‘लाडक्या’ बहिणींचे आभार
हा विजय तळागाळातील कार्यकर्त्यांचा असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘आम्ही सामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी दिली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. तसेच, ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ योजनांचा प्रभाव या निकालांतून स्पष्टपणे दिसून येत असून, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे,’ असंही यावेळी शिंदे यांनी नमूद केलं.