Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: ‘पक्ष नेतृत्वानेच गटबाजीला खतपाणी घातलं…’; मुनगंटीवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील भाजपच्या पिछेहाटीसाठी थेट पक्ष नेतृत्वाला जबाबदार धरले आहे.

Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: ‘पक्ष नेतृत्वानेच गटबाजीला खतपाणी घातलं…’; मुनगंटीवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: राज्यात नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपने यशाची शिखरं सर केली असली, तरी चंद्रपूरमधील पराभवाने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील भाजपच्या पिछेहाटीसाठी थेट पक्ष नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. 'जिल्ह्यातील पराभवाला मी नव्हे, तर पक्ष नेतृत्वाने निर्माण केलेली गटबाजी आणि चुकीचे निर्णय कारणीभूत आहेत,' अशा शब्दांत मुनगंटीवारांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मुनगंटीवारांचा पारा चढला

चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी तब्बल 7 जागांवर काँग्रेसने नगराध्यक्षपद जिंकून भाजपचा धुव्वा उडवला. या मानहानीकारक पराभवानंतर मुनगंटीवारांनी नेतृत्वावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण तयार केले गेले. ज्यांनी निर्णय घेतले, त्यांनी आता या पराभवाचे आत्मचिंतन करावे.  मुनगंटीवारांनी बाहेरील नेत्यांच्या पक्षप्रवेशावरही कडाडून टीका केली. ते म्हणाले की, 'जिल्ह्यातील नेत्यांना किंवा जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता कुणालाही पक्षात घेतले जाते. यामुळे नवीन गट तयार होऊन जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. जे लोक आयुष्यभर संघाच्या विचारांचा विरोध करत आले, त्यांना जर नेतृत्व मांडीला मांडी लावून बसवणार असेल, तर सामान्य कार्यकर्ता शंका उपस्थित करणारच.

हेही वाचा –  Nagarparishad Election Result: भाजपची 'सेंच्युरी', तर शिंदे गटाची 'हाफ सेंच्युरी'! कोणत्या विभागात कुणाचे किती नगराध्यक्ष आणि नगरसेवक? वाचा

मंत्रिपद नाकारल्याने जनतेची नाराजी?

विदर्भातील दुर्लक्षावर बोट ठेवत मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. एकाच जिल्ह्यात 4-4 मंत्रिपदं दिली जातात, पण या महत्त्वाच्या जिल्ह्यांना वाऱ्यावर सोडले गेले. आमचा विकास होईल की नाही, अशी शंका मतदारांच्या मनात निर्माण झाल्यानेच त्यांनी भाजपला नाकारले, असे स्पष्ट मतही यावेळी त्यांनी मांडले.

हेही वाचा – Raksha Khadse On Muktainagar Election Results: 'पराभवाची जबाबदारी माझीच…'; मुक्ताईनगरच्या निकालावर रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया

याला मी जबाबदार नाही – मुनगंटीवारांचा पवित्रा

पराभवाच्या जबाबदारीबाबत बोलताना त्यांनी स्वतःला दूर सारले. 'चंद्रपुरात आता माझे नेतृत्व कुठे आहे? मी मंत्री नाही आणि पक्षाने मला कोणतीही विशेष जबाबदारी दिली नव्हती. ज्यांनी जिल्ह्याचे निर्णय स्वतःच्या हातात घेतले, त्यांनीच या पराभवाचे उत्तर द्यावे,' अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number