Sanjay Raut On Election Results: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांवर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'हे निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय नसून पैशांच्या जोरावर केलेली 'सेटिंग' आहे. विधानसभेत जे आकडे दिसले, तेच आकडे या स्थानिक निवडणुकीतही जाणीवपूर्वक फिट करण्यात आले आहेत,' असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.
'इलेक्ट्रॉनिक सेटिंग'चा पुनरुच्चार
संजय राऊत यांनी निवडणूक निकालांच्या आकड्यांवर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले, 'विधानसभेप्रमाणेच भाजपला 120-125, शिंदे गटाला 50-54 आणि अजित पवारांना 40-42 चा आकडा मिळणे हे केवळ योगायोग नाही. भाजपने त्याच पद्धतीने मशीन सेट केल्या आहेत. किमान संशय येऊ नये म्हणून त्यांनी आकडे तरी बदलायला हवे होते.'
हेही वाचा – Loha Election Result 2025:एकाच कुटुंबाला सहा तिकीट अन् सहाही पराभूत; लोह्यात भाजपला मोठा धक्का
30 कोटींच्या पालिकेवर 150 कोटींची उधळण
या निवडणुकीत पैशाचा अफाट वापर झाल्याचा दावा करत राऊत म्हणाले की, निवडणुकीत पैशांची अशी काही गारपिट झाली की, त्यात सामान्य कार्यकर्त्यांची कष्टानं पेरलेली शेतं उद्ध्वस्त झाली. 30 कोटी बजेट असलेल्या नगरपालिकेवर सत्ताधाऱ्यांनी 150 कोटी रुपये खर्च केले आहेत. नगरपालिकेच्या प्रचारासाठी कधीही हेलिकॉप्टर किंवा खाजगी विमाने वापरली जात नव्हती, मात्र या निवडणुकीत सत्तेच्या मस्तीत पैशांचा धुरळा उडवला गेला, अशी टीकाही यावेळी संजय राऊत यांनी केली.
हेही वाचा – Eknath Shinde Reaction: 'घरात बसणाऱ्यांना जनतेने…'; नगरपरिषद विजयानंतर एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
मुंबई महापालिकेसाठी जागावाटप पूर्ण
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युतीचे संकेत मिळत आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घालून जागावाटपाचे सर्व पेच सोडवले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना जपून आम्ही एकमत केले असून, येत्या 72 तासांत याची अधिकृत घोषणा केली जाईल.' तसेच, भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनेही सोबत यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून दिल्लीतील नेत्यांशी संवाद सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फोडाफोडीच्या राजकारणावर प्रहार
'हा विचारांचा नव्हे, तर सत्तेच्या दहशतीचा विजय आहे,' असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 'आमचा श्रीवर्धनचा नगराध्यक्ष निवडून येताच त्याला पैशाच्या जोरावर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ही कसली निवडणूक आणि कसली लोकशाही?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.