Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले खरे, पण काशिगाव मेट्रो स्थानकावरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांच्या पदरी पहिल्याच दिवशी मनस्ताप आला आहे. स्थानकाचा एक जिना अर्धवट अवस्थेत असल्याने होणारी गर्दी आणि पार्किंगच्या जागेचा अभाव यावरून आता राजकारणही तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानकाची पाहणी करत अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
जिना रखडला, प्रवाशांची कोंडी
काशिगाव स्थानकावर दोन जिने प्रस्तावित असले तरी सध्या केवळ एकच कार्यान्वित आहे. पूजा पार्कच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या जिन्याचे काम जमिनीच्या वादात अडकल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेमुळे हे काम रखडले आहे, ती जागा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे.
सरनाईकांचा टोला आणि फडणवीसांची 'ती' सावधगिरी
मेट्रोच्या उद्घाटन प्रवासादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांमध्ये रंगलेल्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रताप सरनाईक यांनी मिश्किलपणे मुख्यमंत्र्यांना सांगितले की, "मिरा-भाईंदरमधील 30 टक्के जागा नरेंद्र मेहता यांची आहे, त्यातील 10 टक्के ते मला द्यायला तयार आहेत." यावर राजकीय चतुरस्त्र असलेल्या फडणवीसांनी आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्यांकडे लक्ष वेधत, "आपण इथे बोलू आणि हे सर्व रेकॉर्ड करतील," असे म्हणत सरनाईकांना हसत हसत सावध केले. मात्र, या मिश्किल संवादामागे जमिनीच्या मोबदल्यावरून रखडलेल्या जिन्याचा विषय दडलेला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पार्किंगचा प्रश्न आणि मंत्र्यांचे निर्देश
स्थानकावर पार्किंगची सोय नसल्याने पहिल्याच दिवशी अनेक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची जागा सरकारी दराने विकत घेऊन तिथे पार्किंग प्लाझा उभारण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए (MMRDA) अधिकाऱ्यांकडे केली आहे.
प्रशासनाला अल्टीमेटम
प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे आदेश दिले असून, प्रवाशांची सोय म्हणून दुसरा जिना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.