BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या सत्तेचा गड सर करण्यासाठी महायुती आणि ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये रात्रीचा दिवस सुरू आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गट 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवून जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून अद्यापही 'टाळाटाळ' सुरू असल्याचे चित्र आहे.
207 जागा निश्चित
भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत भाजप 128 आणि शिवसेना 79 अशा एकूण 207 जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित 20 जागांवर तोडगा काढण्यासाठी आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' बंगल्यावर पोहोचले आहेत.
अशी आहे जागा वाटपामागील रणनीती
समोरच्या पक्षाचा उमेदवार किती ताकदवान आहे, हे पाहूनच त्या जागेवर भाजपचा की शिवसेनेचा उमेदवार द्यायचा, हे ठरवले जाईल. प्रसंगी उमेदवारांची पक्षांतर्गत अदलाबदलही केली जाईल, असे खा. राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला, तरी त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम आहे. दादर-माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडुप आणि चांदिवली या मतदारसंघांत मनसेने किमान 2 ते 3 जागांची मागणी लावून धरली आहे. 'मातोश्री'वरील बैठकीनंतर मनसे नेते पुन्हा राज ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी 'शिवतीर्थ'वर पोहोचले आहेत.
आदित्य ठाकरेंवर टीका आणि प्रचाराचे नियोजन
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांनी आम्हाला राम शिकवू नये, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख 'बालबुद्धी' असा केला. तसेच, 1 किंवा 2 तारखेपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त जाहीर सभांनी प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.