Gram Panchayat Election: जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या धामधुमीनंतर आता ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा तापणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले आहे. एकूण 3591 जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार असून, यामुळे ऐन उन्हाळ्यात गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
निवडणुकीचे गणित आणि जागा
या निवडणूक कार्यक्रमाद्वारे राज्यातील रिक्त असलेल्या 471 सरपंचपदांसाठी आणि 3120 सदस्यपदांसाठी मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक जाहीर होताच संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली असून, इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे: 7 ते 13 एप्रिल 2026.
अर्जांची छाननी: 15 एप्रिल 2026.
अर्ज मागे घेण्याची मुदत: 17 एप्रिल 2026 (दुपारी 3 वाजेपर्यंत).
मतदान: 28 एप्रिल 2026 (सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30).
मतमोजणी: 29 एप्रिल 2026.
नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे.
राजकीय हालचालींना वेग
पोटनिवडणूक असली तरी स्थानिक सत्ता राखण्यासाठी आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. गावागावांतील चावडीवर आता रणनीती आखली जात असून, पॅनेल बनवण्यासाठी गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. 29 एप्रिलला होणाऱ्या मतमोजणीनंतर गावची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल.