Aaditya Thackeray: राज्यभरात सीईटी (CET) परीक्षेतील संभाव्य घोटाळ्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उद्यापासून प्रवेश प्रक्रिया (Admission) सुरू होत असताना, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ‘CET घोटाळा झाला आहे की नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे भाष्य करावे’, अशी आक्रमक मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
तरुणांच्या भविष्याशी खेळ; आदित्य ठाकरेंचे गंभीर प्रश्न
आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, प्रवेश प्रक्रिया सुरू होत असतानाच विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. BJP शी संबंधित व्यक्तीच या अशा प्रकरणांमध्ये कशी पुढे येते, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्यापासून सुरू होणाऱ्या ऍडमिशन प्रक्रियेत घोळ आहे की नाही, यावर शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
भाजपचेच नेते पेपर फुटीत सहभागी: नाना पटोले
दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मुद्द्यावरून केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. “पेपर फुटीच्या सर्व घोटाळ्यांमध्ये भाजपचेच नेते आणि त्यांची माणसे सहभागी असल्याचे समोर येत आहे,” असा गंभीर आरोप पटोले यांनी केला. नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात आले असून, देशातील युवा वर्ग आता याविरुद्ध एकवटत आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हाच आता एकमेव पर्याय उरला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.