BMC Election 2025 : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजपने पहिल्याच फेरीत शिंदे गटाला केवळ 52 जागांची ऑफर दिल्याने शिवसेनेत (शिंदे गट) मोठी अस्वस्थता पसरली आहे. समाधानकारक जागा न मिळाल्यास मुंबईतील सर्वच्या सर्व 227 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेण्याचा दबाव आता एकनाथ शिंदे यांच्यावर वाढू लागला आहे.
जागावाटपाचा पेच काय?
मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गट शिवसेनेने मुंबईत 125 जागांचा दावा केला आहे. तसेच भाजपने शिंदे गटाचे अनेक जागांवरील दावे फेटाळून लावत केवळ 52 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा आणि विधानसभेत मोठ्या प्रमाणावर तडजोड केल्याने, आता हक्काच्या मुंबई महापालिकेत नमते घेऊ नये, अशी भावना शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Manikrao Kokate Health Update: माणिकराव कोकाटेंवर आज अँजिओग्राफी; पोलिसांचे पथक लीलावती रुग्णालयात दाखल
2400 इच्छुकांच्या मुलाखती
जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. मंगळवारी मुंबईतील 227 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी तब्बल 2400 इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली. ही मोठी गर्दी पाहता पक्षाची ताकद वाढल्याचा दावा नेत्यांकडून केला जात असून, जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी हा आकडा भाजपवर दबाव वाढवणारा ठरू शकतो.
श्रद्धा आणि सबुरी ठेवा; एकनाथ शिंदेंचे आश्वासन
नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून एकनाथ शिंदे यांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटलं आहे की, केंद्रात आणि राज्यात आपले मजबूत सरकार असल्याने जागावाटपाचा प्रश्न चर्चेने सुटेल. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात चर्चा होऊन लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल. तथापी, पक्षाचा सन्मान राखला जाईल, असा विश्वासही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला आहे.