Praful Patel: बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या अनुपस्थितीबाबत मोठे विधान केले आहे. “शरद पवार यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामतीचा लांबचा प्रवास करण्याची जोखीम पत्करू नये. त्यांनी सभेला येऊ नये, त्यांनी केवळ सुनेत्रा वहिनींना आशीर्वाद द्यावेत,” अशी विनंती आपण स्वतः शरद पवार यांना केल्याचं पटेल यांनी सांगितलं आहे.
प्रकृतीला प्राधान्य आणि सुप्रिया सुळेंची उपस्थिती
प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, त्यांनी स्वतः सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याशी संवाद साधला होता. “शरद पवारांची प्रकृती सध्या नाजूक असून या कडाक्याच्या उन्हात त्यांनी प्रवास करणे योग्य नाही. स्वतः पवारांनीही ही बाब मान्य केली असून, त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सुप्रिया सुळे या सभेत उपस्थित राहिल्या आहेत,” असे पटेल म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी शरद पवारांचे आशीर्वाद सदैव राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रोहित पवारांना नाव न घेता टोला
प्रचारसभेत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. “राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी आणि आपल्या काकूंसाठी कोणी प्रचारात येत असेल, तर त्याचे स्वागतच आहे. शेवटी घरचे नाते महत्त्वाचे असते,” असे म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या भूमिकेवर टिप्पणी केली.
अजितदादांना ‘विक्रमी’ मतांनी श्रद्धांजली देण्याचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी भावनिक साद घातली. “अजित पवार यांनी जो विकासाचा विक्रम बारामतीत प्रस्थापित केला होता, तोच विक्रम आता सुनेत्रा वहिनींना निवडून देऊन बारामतीकरांनी मोडावा. हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन त्यांनी केले. अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
महायुतीचे शक्तीप्रदर्शन
या सांगता सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत आणि रामदास आठवले यांसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनीही सभेत हजेरी लावत अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या मातोश्रींची (आशा काकी) भेट घेतल्याचे सांगितले. बारामतीची जनता अजित पवारांच्या पक्षाला आणि त्यांच्या वारशाला साथ देईल, असा ठाम विश्वास महायुतीच्या सर्वच नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.