BMC Election 2026 : महापालिका निवडणुकांचे मतदान अवघ्या 5 दिवसांवर आले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. 15 जानेवारीच्या मतदानापूर्वीच मुंबईत ठाकरेंना दोन जबरदस्त धक्के बसले आहेत. माजी आमदार दगडू सपकाळ यांच्यानंतर आता गोरेगावचे सलग 4 वेळा नगरसेवक राहिलेले दिलीप शिंदे यांनीही पक्षाला 'जय महाराष्ट्र' केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
गोरेगावचा बालेकिल्ला धोक्यात?
गोरेगावमधील अत्यंत प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जाणारे दिलीप शिंदे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या नाराजीमागे 'ठाकरे गट-मनसे' युती असल्याचे बोलले जात आहे. दिलीप शिंदे ज्या प्रभागातून सलग 4 वेळा निवडून आले होते, तो प्रभाग युतीमध्ये मनसेला सोडण्यात आला. स्वतःचा मतदारसंघ मित्रपक्षाला दिल्याने शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. अखेर निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तडकाफडकी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ते आता कोणत्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut: 'आजही आम्ही 10 मिनिटांत मुंबई बंद करू शकतो'; संजय राऊतांचा थेट इशारा
दगडू सपकाळांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ
यापूर्वी आजच शिवडीचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मी छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत सपकाळ यांनी आपली व्यथा मांडली. प्रभाग क्रमांक 203 मधून त्यांची मुलगी रेश्मा सपकाळ निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र पक्षाने त्यांना डावलल्याने सपकाळ यांनी ठाकरेंची साथ सोडली.
निवडणुकीच्या तोंडावर पडझड
येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून सर्वच पक्ष प्रचाराच्या धडाक्यात असताना, एकाच दिवसात दोन दिग्गज नेत्यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निष्ठावंत जुन्या फळीतील नेत्यांची ही पडझड निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.