Tech Layoffs 2026 : तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) मुळे मोठी क्रांती होत असतानाच, दुसरीकडे रोजगाराच्या आघाडीवर चिंतेचे ढग दाटले आहेत. 2026 वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतच जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. मेटा, ओरेकल आणि ॲमेझॉन यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी एआय पुनर्रचनेच्या नावाखाली आतापर्यंत 35,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
मेटा, ओरॅकल आणि ॲमेझॉनचा मोठा निर्णय
एआय क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि गुंतवणुकीचा ताण यामुळे बड्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे.
– मेटा (Meta): फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने जानेवारीमध्ये आपल्या 'रिॲलिटी लॅब्स' विभागातील 10 टक्के कर्मचारी कमी केले आहेत. जवळपास 15,000 कर्मचारी असलेल्या या विभागातून अनेक जण बाहेर पडले आहेत. कंपनी आता मेटाव्हर्सऐवजी पुढच्या पिढीतील एआय विकसित करण्यावर भर देत आहे.
– ॲमेझॉन (Amazon): ऑनलाइन किरकोळ विक्री क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने जानेवारीमध्ये 16,000 कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. ऑक्टोबर 2025 नंतरची ही कंपनीची दुसरी मोठी कर्मचारी कपात आहे. एआय क्षेत्रातील स्पर्धा पाहता ऑपरेशन्स सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
– ओरॅकल (Oracle): क्लाउड सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल देखील हजारो कर्मचाऱ्यांच्या कपातीची तयारी करत आहे. एआय डेटा सेंटर्सवर होणारा अवाढव्य खर्च आणि रोख रकमेची टंचाई यामुळे कंपनीने हा कठोर निर्णय घेतला आहे.
एआय पुनर्रचना आणि गुंतवणुकीचा नवा कल
'Layoffs.fyi' च्या आकडेवारीनुसार, 2026 च्या पहिल्या काही महिन्यांतच जवळपास 50 तंत्रज्ञान कंपन्यांनी एकूण 35,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. कंपन्या आता मानवी श्रमाऐवजी ऑटोमेशन आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. खर्चात कपात करून हा पैसा एआय टूल्स आणि प्रगत संगणकीय प्रणालींकडे वळवला जात आहे. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कामाच्या स्वरूपात मोठा बदल होत आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने
या कर्मचारी कपातीमुळे तंत्रज्ञान क्षेत्र एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट होत आहे. जिथे एआय आणि ऑटोमेशन व्यवसायाच्या केंद्रस्थानी असतील. कंपन्या नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असल्या तरी, त्या आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि संरचनेचा फेरविचार करत आहेत. अशा परिस्थितीत, तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी एआय-संबंधित कौशल्ये आत्मसात करणे आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे हे आगामी काळात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Restructuring : वाढत्या स्पर्धेचा परिणाम
अनेक कंपन्यांनी आपली प्राथमिकता बदलली आहे. एआय क्रांतीमुळे कंपन्यांना कमी मनुष्यबळात अधिक काम करणे शक्य होत आहे, ज्याचा थेट परिणाम रोजगारावर होत आहे. ही कपात केवळ खर्च कमी करण्यासाठी नसून, भविष्यातील डिजिटल युद्धासाठी संसाधने गोळा करण्यासाठी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तंत्रज्ञान विश्वात सध्या तरी एआयचा उदय आणि मानवी नोकऱ्यांची कपात असे व्यस्त प्रमाण पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Apple Foldable Iphone: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन; नाव, आणि किंमतही आली समोर, वाचून तुम्हालाही बसेल धक्का