Blind Women's T20 World Cup: अंध महिला टी-20 क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या ऐतिहासिक आवृत्तीत भारताने जोरदार प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. पी. सारा ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळवर सात विकेट्सने मात करत विजय मिळवला. प्रथम गोलंदाजी निवडलेल्या भारताने नेपाळला केवळ 5 बाद 114 धावांवर रोखत सामन्याची पकड सुरुवातीपासूनच मजबूत केली. नेपाळच्या संपूर्ण डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व इतके प्रखर होते की, प्रतिस्पर्धी फलंदाजांना एकच चौकार नोंदवता आला. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने जबरदस्त अचूकतेने खेळ करत 12 षटकांत 3 बाद 117 धावा करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
भारतीय फलंदाजांमध्ये फुला सरीनने नाबाद 44 धावांसह चमकदार प्रदर्शन केले आणि विजयाचा पाया भक्कम केला. यापूर्वी उपांत्य फेरीत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. नेपाळने उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाकिस्तानच्या बी-3 श्रेणीतील खेळाडू मेहरीन अलीने संपूर्ण स्पर्धेत तब्बल दोन मोठ्या शतकांसह दमदार बॅटिंग केली. परंतु, पाकिस्तानला उपांत्य फेरीत नेपाळकडे पराभव पत्करावा लागला, तरी मेहरीनच्या कामगिरीची दखल सर्वांनी घेतली. या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अंध महिला टी-20 विश्वचषकात भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचा समावेश असलेल्या सहा संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात 11 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये झाली. काही सामने बंगळुरूमध्ये खेळल्यानंतर अंतिम फेरी श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये पार पडली.
भारताच्या 16 सदस्यीय संघात देशातील नऊ राज्यांतील खेळाडूंचा समावेश होता. संघाचे नेतृत्व करणारी दीपिका टीसी (कर्नाटक) हिने बालपणीच्या अपघातामुळे आपली दृष्टी गमावलेली असूनही तिच्या नेतृत्वाने भारताला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे अंध क्रिकेटच्या क्षेत्रात नवीन अध्याय सुरुवात झाली आहे. भारतीय संघाचे हे यश कौशल्य, जिद्द आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे.