Shashikant Shinde: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते शशिकांत शिंदे यांनी भाष्य करताना अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. “तनपुरे यांची निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती, ही वस्तुस्थिती आहे,” असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या नव्या रणनीतीचे संकेत दिले आहेत.
भाजप नेत्यांच्या मध्यस्थीची चर्चा?
प्राजक्त तनपुरे यांच्या माघारीमागे भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “दुपारी 1 वाजेपर्यंत आमचा त्यांच्याशी संवाद सुरू होता. भाजपचे नेते त्यांच्याशी चर्चा करायला गेले होते, अशी माहिती मला मिळाली आहे. कदाचित भाजपला स्वतःच्या विजयाची खात्री नसावी, म्हणूनच अशा प्रकारची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. मात्र, संघर्षातूनच कार्यकर्ता उभा राहतो आणि आम्ही लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
नव्या उमेदवाराला संधी आणि भविष्यातील रणनीती
तनपुरेंनी माघार घेतली असली तरी महाविकास आघाडीने तिथे सक्षम उमेदवार दिला असल्याचे शिंदेंनी स्पष्ट केले. “निवडणूक लागल्यानंतर आम्ही प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या समर्थकांशी चर्चा करू. ते या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. काही लोक तिकीट घेतात, निवडणूक लढवतात आणि पराभूत झाल्यावर पक्षात न थांबता भाजपमध्ये जातात. अशा गोष्टींकडे लक्ष न देता आम्ही आता नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत,” असेही त्यांनी नमूद केले. शशिकांत शिंदे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. “जर भाजपला वाटत असेल की ते स्वबळावर निवडून येऊ शकतात, तर त्यांना वारंवार दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना विनवण्या का कराव्या लागतात? इतर पक्षातील लोकांना प्रवेश का द्यावा लागतो? याचाच अर्थ असा की, महाराष्ट्रात भाजपला स्वतःच्या ताकदीवर विश्वास राहिलेला नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
‘पोटनिवडणूक आणि बिनविरोध’चा वाद
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. “भाजपने आतापर्यंत अनेक पोटनिवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले आहेत, मग तिथे कोणाचे वडील किंवा पती वारलेले नव्हते का? बारामतीला वेगळा न्याय आणि राहुरीला वेगळा न्याय हे चालणार नाही. भाजपने अनेक ठिकाणी परंपरेला छेद देऊन निवडणुका लढवल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये,” अशा शब्दात शिंदेंनी भाजपला धारेवर धरले.