Dharashiv Politics : धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे तगडे आव्हान समोर असतानाही, तानाजी सावंत यांनी आपल्या होमग्राऊंडवर 'फिल्डिंग' लावत तिन्ही पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. भूम, परांडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांत सावंत समर्थकांनी सभापती पदावर आपले नाव कोरत विरोधकांना धोबीपछाड दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे हा संघर्ष सावंतांसाठी मोठा होता. मात्र, तिन्ही तालुक्यांत सत्ता काबीज केल्यानंतर सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील 'नंबर वन'चे नेते ठरले आहेत.
प्रतिष्ठेच्या लढतीत सावंतांची सरशी
भूम, परांडा आणि वाशी या मतदारसंघातील पंचायत समिती निवडणुका तानाजी सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि इतर स्थानिक आघाड्यांनी मिळून तगडे आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालात तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तिन्ही पंचायत समित्यांच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आल्याने या भागात सावंतांची पकड अधिक घट्ट झाली आहे.
भूममध्ये 'वंचित'ची साथ अन् सत्तेचे गणित
भूम पंचायत समितीची लढत अतिशय अटीतटीची झाली. येथे एकूण 10 जागांपैकी शिवसेना पक्षाला 5 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादीला 3, भाजपला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळाली. सत्ता स्थापनेसाठी 6 सदस्यांच्या बहुमताची आवश्यकता होती. अशा वेळी तानाजी सावंत यांनी राजकीय चातुर्य दाखवत वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवार प्रियंका रणबागुल यांना उपसभापती पद दिले आणि शिवसेनेची सत्ता स्थापन केली. परांडा पंचायत समितीमध्ये अर्चना जाधव यांची सभापती पदी, तर परसु गवारे यांची उपसभापती पदी निवड झाली आहे.
राजकीय वर्चस्व आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
या विजयामुळे धाराशिवच्या राजकारणात तानाजी सावंत यांचे वजन कमालीचे वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विजय शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी हा विजय म्हणजे जनतेने दिलेला कौल असल्याचे सांगत जल्लोष केला. विरोधकांच्या एकीला तडे देत सावंतांनी मिळवलेली ही सत्ता सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या विजयाची बातमी समजताच शिवसेना कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात गुलालाची उधळण केली. ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीसह मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.