CM Vijay Government in Tamilnadu : तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते जोसेफ विजय (Joseph Vijay) यांच्या सरकारला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात तब्बल 144 आमदारांचे भक्कम पाठबळ मिळाले आहे. हा महत्त्वपूर्ण विजय मिळवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करत कामाचा धडाका लावला आहे. संपूर्ण देशभरात सध्या मुख्यमंत्री विजय यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, ही यशस्वी घोडदौड सुरू असतानाच, मुख्यमंत्री विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेल्या ‘सीपीआय-एम’ (CPI-M) या डाव्या पक्षाने थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सीपीआय-एमचा थेट इशारा; समर्थनाचा करणार पुनर्विचार
एका वृत्तानुसार, जर मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी 'एआयएडीएमके'च्या (AIADMK) आमदारांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले, तर आम्ही सरकारला दिलेल्या पाठिंब्याचा तीव्रतेने पुनर्विचार करू, असा स्पष्ट आणि कडक इशारा सीपीआय(एम) पक्षाकडून देण्यात आला आहे. सीपीआय(एम) चे राज्य सचिव पी. षण्मुगम यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, 'आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुख्यमंत्री विजय असा कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. परंतु, जर त्यांनी एआयएडीएमकेच्या गटाला मंत्रिपदे देण्याचा निर्णय घेतला, तर मात्र आम्हाला आमच्या समर्थनाचा फेरविचार करावा लागेल.' या विधानामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवे नाट्य निर्माण झाले आहे.
एआयएडीएमके पक्षातील फूट आणि सत्तेचे गणित
तमिळनाडूतील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षात माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनानंतर अखेर मोठी फूट पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एस.पी. वेलुमणी आणि सी.वे. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील 25 आमदारांच्या एका मोठ्या गटाने मुख्यमंत्री विजय यांच्या 'टीव्हीके' सरकारला प्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील केवळ 22 आमदारांनी सध्या विरोधात राहण्याची भूमिका घेतली आहे. विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या या 25 आमदारांच्या गटाला आगामी काळात मंत्रिमंडळात मोठी पदे आणि स्थान मिळणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते, परंतु डाव्या पक्षांच्या विरोधामुळे आता हा तिढा वाढला आहे.
मुख्यमंत्री विजय यांच्यासमोरील राजकीय पेच
अण्णाद्रमुकच्या एका बंडखोर गटाने पाठिंबा दिल्यामुळे मुख्यमंत्री विजय यांचे सरकार बहुमताच्या आकड्यावर पोहोचले असले, तरी डाव्या पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे विजय यांच्यासमोरील राजकीय अडचणी कमालीची वाढल्या आहेत. एका बाजूला पाठिंबा देणाऱ्या 25 आमदारांना खुश ठेवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांची नाराजी दूर करणे, अशा कात्रीत मुख्यमंत्री अडकले आहेत. आगामी काळात मुख्यमंत्री विजय अण्णाद्रमुकच्या आमदारांना सोबत घेऊन सरकार चालवणार की 'सीपीआय-एम'चा इशारा लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तारात बदल करणार, याकडे आता संपूर्ण दक्षिण भारताचे लक्ष लागले आहे.